- अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यात पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वाद प्रखर झाला
- अजित पवारांनी महेश लांडगे यांना थेट इशारा देत नादला लागू नका असं सांगितलं आहे
- महेश लांडगे यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शहराच्या अस्मितेचा मुद्दा उठवला आहे
सूरज कसबे
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या थंडीच्या दिवसात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात सध्या थेट शाब्दिक चकमक पाहायला मिळतेय. मी नादाला लागलो तर सोडत नाही, असा इशारा अजित पवारांनी दिला होता. त्याला तेवढ्याच ताकदीने लांडगे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले आम्ही काय हातात बांगड्या भरल्यात का? अशा शब्दांत महेश लांडगेंनी प्रत्युत्तर दिले आहे. महायुतीमधील हा 'अंतर्गत कलह' आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील वाद पेटण्याची दाट शक्यता आहे.
सध्या दादा विरुद्ध दादा असा सामना पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने रंगला आहे. एकेकाळी अजित पवारांच्या तालमीत तयार झालेले महेश लांडगे आज त्यांच्याच समोर शड्डू ठोकून उभे ठाकले आहेत. या वादाची ठिणगी पडली ती अजित पवारांच्या एका विधानाने. मी गुंडगिरी करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही, आणि माझ्या नादाला कुणी लागलं, तर मी त्याला सोडत नाही असा थेट दम अजित पवारांनी भरला होता. अजित पवारांचा हा रोख थेट महेश लांडगेंच्या दिशेने होता. पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा देत लांडगेंवर सडकून टीका केली होती.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की मीच लांडगेंना स्थायी समिती अध्यक्ष केलं, त्यांनी तिथून हवं ते केलं. विधानसभेला विलास लांडेंविरोधात बंडखोरी केली. शहरात सध्या कुणाची दादागिरी आणि भ्रष्टाचार सुरू आहे, हे सर्वांना माहीत आहे. वरिष्ठ नेते बिझी असतील, पण मी पालकमंत्री म्हणून सगळीकडे लक्ष ठेवून आहे असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या इशाऱ्याला पैलवान महेश लांडगे यांनी धोबीपछाड स्टाईलने उत्तर दिले आहे. लांडगेंनी थेट अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत शहराच्या अस्मितेचा मुद्दा समोर केला.
नक्की वाचा - PMC Election 2026: 'पुणे लवकर बरबाद होईल'!, राज ठाकरे आपल्या मुलाखतीत असं का म्हणाले?
महेश लांडगे यांनी थेट अजित पवारांना अंगावर घेतलं. आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? कुणीही येऊन आम्हाला धमकावेल असं समजू नका. अजित पवारांना शहरात ओळखत कोण होतं? शरद पवारांनी त्यांना मोठं केलं, मग ते भाजपसोबत का आले ? कुणी कुणाला मोठं करत नसतं, लोक निवडून देतात. शहराचे मालक बनण्याचा प्रयत्न करू नका, लोकसेवक बनून राहा अशा पैलवान स्टाईल दमच महेश लांडगे यांनी अजित पवारांना भरला. एकीकडे महायुती म्हणून सरकार चालवले जात असताना, पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणात मात्र अजित पवार आणि महेश लांडगे यांच्यातील ही तु तु-मै मै आता कुठल्या वळणावर जाते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.