BMC Election 2026, Devendra Fadnavis Speech : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दादर येथील शिवाजी पार्कवर महायुतीची विराट सभा पार पडली. राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत, अशी साद घालत त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच इरादे स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शैलीत लाव रे तो व्हिडिओ म्हणत फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जुन्या भाषणांच्या क्लिप्स दाखवून त्यांची पोलखोल केली. 11 जानेवारी रोजी याच मैदानात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली होती, त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी टीकेची झोड उठवली.
विमानतळाच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंना घेरले
नवी मुंबई विमानतळावरून राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले. मुंबई विमानतळ विकायचे आहे म्हणून नवी मुंबईचे विमानतळ सुरू होत असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला स्वतःला जागा पुरत नाही म्हणून तुम्ही मातोश्री 1 वरून मातोश्री 2 बांधले आणि राज ठाकरे कृष्णकुंजवरून शिवतीर्थ या नव्या घरावर गेले.
( नक्की वाचा : Dharavi : 5 वर्ष करमाफी, अपात्र व्यक्तींनाही घरं आणि धारावीची मालकी कुणाची? मुख्यमंत्र्यानी दिली सर्व उत्तरं )
जर तुम्हाला स्वतःसाठी विस्ताराची गरज भासते, तर मुंबईच्या विमानतळाचा विस्तार का नको? असा सवाल त्यांनी विचारला. गेल्या 25 वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाची मागणी प्रलंबित होती, पण तुम्ही काहीच केले नाही. महायुतीचे सरकार आल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यावर या कामाला गती दिली, असे त्यांनी स्पष्ट केले.
( नक्की वाचा : Jitendra Awhad : 'झुटा जितेंदर, तुतारीची मुतारी'23 वर्ष जुना सहकारी युनस शेख आव्हाडांवर भर सभेत घसरला, VIDEO )
मुंबईत तिसऱ्या विमानतळाची मोठी घोषणा
मुंबईच्या विकासाचा नवा रोडमॅप मांडताना फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. लंडनसारख्या शहरात जर 3 विमानतळ असू शकतात, तर माझ्या मुंबईत 3 विमानतळ का असू नयेत? असा प्रश्न विचारत त्यांनी मुंबईत तिसरे विमानतळ उभारण्याची घोषणा केली. तसेच सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची क्षमता दीडपट वाढवून ते अधिक मोठे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन हे पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
ठाकरे बंधूंच्या युतीवर सडकून टीका
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर पूर्वी केलेली टीका आणि आताची त्यांची जवळीक यावर फडणवीस यांनी भाषणात मार्मिक भाष्य केले. मुंबई कुणाच्याही बापाची जहागीर नाही आणि ती महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, असे सांगताना त्यांनी 25 वर्षे सत्तेत असताना नक्की काय केले, असा जाब विचारला.
इतकी वर्षे महापालिकेत राहूनही मराठी माणूस आजही अडचणीत असेल, तर तुम्हाला मते मागण्याचा अधिकार उरलेला नाही, अशा कडक शब्दांत त्यांनी सुनावले. आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चेच्या आव्हानावर बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आमच्या उमेदवार शीतल गंभीर या पुरेशा आहेत.
काँग्रेसशी हातमिळवणीवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत केलेल्या युतीवर फडणवीस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज स्वर्गातून हे सर्व पाहात असतील, तर त्यांना काय वाटत असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आपला मुलगा ज्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी आयुष्यभर लढा दिला, त्या विचारसरणीच्या लोकांसोबत बसला आहे, हे पाहून त्यांना नक्कीच वेदना होत असतील, असे ते म्हणाले.
अदाणी समुहावरील टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसशासित राज्यांमध्येही अदाणींनी मोठी गुंतवणूक केली आहे. आम्ही गुंतवणूकदारांचे स्वागत करू, पण कोणालाही गैरफायदा घेऊ देणार नाही.
पारदर्शक कारभाराचा संकल्प आणि आवाहन
मुंबईला कफनचोर आणि बॉडी बॅग घोटाळेबाजांपासून मुक्त करून पारदर्शक कारभार देण्याचा आमचा संकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. भाषणाच्या शेवटी त्यांनी एका शायरीच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर दिले. जिसे निभाना सकू ऐसा वादा नही करता, मै अपनी बाते औकात से ज्यादा नही करता, भले ही तमन्ना रखता हू असमां छू लेने की, लेकीन औरों को गिराने का इरादा नही रखता, अशा शब्दांत त्यांनी आपला आत्मविश्वास व्यक्त केला. येत्या 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाणाचे बटन दाबून मुंबईकरांच्या हक्काचे सरकार निवडून आणण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world