Malegaon Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपली आहे. पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसही अॅक्टिव्ह मोडवर आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे.
महापालिका निवडणूक काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी नाशिकच्या मालेगावात पोलीस प्रशासनाने ॲक्शन प्लान तयार केला आहे. शहरातून तब्बल १११ उपद्रवींची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यातील सहा जणांचे एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर केले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १५ जणांना हद्दपार करण्यात आले असून दोन दिवसात तडीपारीची अंमलबजावणी केली जाणार आहे.
आतापर्यंत ९१ उपद्रवींना प्रतिबंधात्मक नाोटीस पाठवून चांगल्या वर्तणुकीचे बॉण्ड घेण्यात आले आहे. यामध्ये काही राजकीय पक्षांचे नेते, माजी नगरसेवक, उपद्रवी, गुन्हेगार अशा १११ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मालेगाव शहराची शांततेत कुठल्याही प्रकारची तडजोड न करता थेट कायद्याचा दणका देत ॲक्शन प्लान हाती घेण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी दिली.