Poonam Maharaj on the Marathi identity : राज्यभरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वारं जोरात वाहत आहे. मुंबई मराठी माणसाचा मुद्दा गाजतोय. उद्धव ठाकरेंनी गेल्या कित्येक वर्षात मराठीसाठी काहीच केलं नसल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावेळी भाजप नेत्या पूनम महाराज यांनी NDTV नेटवर्कतर्फे आयोजित केलेल्या 'NDTV BMC Power Play' या विशेष कार्यक्रमात मराठीच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली.
पूनम महाजन म्हणाल्या, ठाकरे बंधुंसाठी अस्तित्वाची लढाई आहे. ते एकत्र आले ते स्वत:चा पक्ष वाचविण्यासाठी. आमची जनतेच्या विकासाची लढाई आहे. मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे. मुंबई कुठेच जाणार नाही. शिवसेना म्हणते, आम्ही १९६० पासून मराठी अस्तित्वासाठी लढतोय. गेल्या २५ वर्षात मराठी माणसासाठी त्यांनी काय केलं? लालबाग-परळला असलेला माणूस कुठे गेला? गिरणी कामगारांसाठी काय केलं? बीडीडी चाळीसाठी काय केलं? मुख्यमंत्र्यांनी बीडीडी चाळीच्या जागी इमारती बांधल्या.
मराठी भाषेचा जुना इतिहास आहे, अभिजात भाषेचा दर्जा एनडीएने मिळवून दिला. मराठी अस्मिता कशी राहील? मूळात मराठी माणसाची अस्मिता कशी राहिल? केवळ वडापावच्या गाड्या लावून त्यावर शिवसेना लिहून मराठी अस्मिता राहणार नाही. मराठी माणसाला चांगलं शिक्षण मिळालं, जागतिक स्तरावर त्याला संधी मिळाली तर मराठी अस्मिता टिकेल आणि मराठी माणसाचा विकास होईल.
पूनम महाजन आणखी काय म्हणाल्या?
ठाकरे बंधुंना टोला
"रस्ते, शिक्षण, पाण्याची व्यवस्था हे विकासाचे आमचे मुद्दे आहे, इतर मुद्दे आमच्यासाठी महत्त्वाचे नाही.इतकी वर्ष काय केलं हे सांगण्यापेक्षा मराठी अस्मितेच्या मुद्यावर विरोधक बोलतात. मात्र हा मराठी अस्मितेचा मुद्दा आहे की त्यांच्या अस्तित्वाचा आहे, हे पाहावं लागेल. भाऊभाऊ एकत्र आले चांगली गोष्ट आहे. मात्र स्वतःच्या बचावासाठी, पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी एकत्र आले आहेत. पुढे अंधकार दिसत असल्यानेच भाऊ भाऊ एकत्र आले. हे सर्वांना दिसत आहे. जनता वेडी नाही, जनता सर्व काही जाणते," असा टोलाही त्यांनी ठाकरे बंधुंना लगावला.
"निवडणुका आल्या की मराठी अस्मिता आठवते. पण अभिजात भाषेचा दर्जा मराठीला कोणी दिला? आम्ही तो सर्वात आधी दिला. मराठी माणसाची अस्मिता कशी ठेवावी? त्याला वडापावची गाडी देऊन चालत नाही. या गोष्टी १५ तारखेपर्यंत बोलायला बऱ्या वाटतात. मराठी माणूस काही तुमची मक्तेदारी आहे का? मराठी माणसाची अस्मिता आम्हाला शिकवू नये, मराठी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे," असा टोलाही पूनम महाजन यांनी ठाकरे बंधुंना लगावला.