विशाल पुजारी, प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यानं काँग्रेस नेते विशाल पाटील बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. त्याचवेळी शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसचं टेन्शन वाढलंय. काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांना हा सर्वात मोठा धक्का समजला जातोय.
पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. दरम्यान काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी बंडखोरी करत आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले पक्षात गेली 27 वर्ष काम केलं हे काम निष्ठेन आणि प्रामाणिकपणे केलं तरीही लोकसभा उमेदवारी देताना आमच्या नावाचा विचार केला गेला नाही याची खंत वाटते म्हणून मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. बाजीराव खाडे हे राष्ट्रीय काँग्रेसच्या टीम प्रियांका मधील महत्त्वाचे नेते आणि गांधी परिवाराचे निष्ठावंत विचारधारेचे नेते म्हणून ओळखले जातात.
आघाडीत बिघाडी होणार? सांगलीत पेच, विशाल पाटीलांचं ठरलं!
काय म्हणाले खाडे?
'काँग्रेस पक्षात मी गेली 28 वर्ष काम करतोय. युवक काँग्रेससह वेगवेगळ्या राज्यातील संघटनांमध्ये तसंच राष्ट्रीय सचिव म्हणून देखील काम केलंय. मी गेली वर्ष-दीडवर्ष लोकसभा निवडणुकांची तयारी करतोय. या मतदारसंघातील प्रत्येक गाव तसंच शहरामधील प्रत्येक प्रभागात संपर्क करुन मी काम करण्याचा प्रयत्न केला.
हे सर्व करुन मी सहकार क्षेत्रात, पंचायत क्षेत्रात काम केलं. कोल्हापूरच्या प्रश्नांवर रस्त्यावर लढाई लढलो. पक्षामध्ये गेली वर्षभर मी सोडून कुणीही जाहीरपणे उमेदवारी मागत नव्हतं. त्यानंतर उमेदवारी देताना तिकीट वाटप प्रक्रियेत पक्षानं आम्हाला कुठंही विचारात घेतलं नाही. गेल्या 28 वर्षांमधील पक्षाच्या प्रवासानंतरही मी उमेदवारी अर्ज भरतोय याचं मला दु:ख होतंय,' या भावना व्यक्त करताना खाडे यांना अश्रू अनावर झाले होते.
सांगलीतून माघार नाहीच; चंद्रहार पाटलांनी एका वाक्यात विषयच संपवला!
'कार्यकर्ता एक विचारधारेनं काम करतो. सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता सर्वस्व पणाला लावून काम करत असतो. त्यानं केलेलं काम, त्याचं पक्षासाठीचं योगदान हे प्रत्येक कार्यकर्त्याचं दुर्लक्षित होणार असलं आणि त्याच्यावर ही वेळ येत असेल तर ते फार दुर्दवी आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आवाज बनून मी उमेदवारी अर्ज भरला आहे,' असं खाडे यांनी सांगितलं.