Pune Municipal Corporation election 2026 : पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचल्याने कुजबुज सुरू झाली आहे. पुण्यात काही पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इच्छुकांना महानगरपालिका निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. त्यानंतर अशा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी पुणे पोलिसांकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे. यामध्ये छोटे आणि मोठे असे २० गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची नावं आहेत. यासाठी पोलिसांकडून एक निरीक्षण समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशा उमेदवारांवर लक्ष ठेऊन असणार आहे.
पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार...
सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कुख्यात गुंड गजानन मारणे याची पत्नी जयश्री मारणे, गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकर अशा उमेदवारांची नावे यादीमध्ये समाविष्ट असल्याची माहिती आहे. पोलिसांची करडी नजर या सगळ्या उमेदवारांवर असणार आहे. या उमेदवारांकडून कुठलाही गैरप्रकार होत नाही ना याकडेही पोलिसांचं लक्ष असेल.
सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर - राष्ट्रवादी अजित पवार
बंडू आंदेकर - अपक्ष
जयश्री मारणे - भाजप
कल्याणी कोमकर - अपक्ष
बापू नायर - राष्ट्रवादी अजित पवार गट
पत्नीसाठी गुंड गजा मारणेचे काहीना फोन...
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा निवडणुकीत प्रचार सुरू आहे. गजा मारणेच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर आहे. कोथरूडमधील गुंड गजानन उर्फ गजा मारणेची पत्नी महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवार आहे. त्या पार्श्वभूमीवर मारणे याने काहींना दूरध्वनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर मारणेच्या हालचालींवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. गजा मारणे याची पत्नी जयश्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कोथरूड भागातून त्या निवडणूक लढवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर, "निवडणुकीत पत्नीला मदत करा,' यासाठी तो अनेकांना फोन करीत असल्याची माहिती आहे.
महापालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार, त्यांच्या नातेवाइकांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. गजा मारणे याने काही जणांशी संपर्क साधल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. असे दूरध्वनी मारणेने कोथरूडमधील काही जणांना केल्याची माहिती मिळाल्याने आचारसंहितेचे पालन व्हावे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मारणेच्या हालचालींवर नजर ठेवली आहे, पुण्याचे पोलीस प्रमुख अमितेश गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली. 'मारणे याच्या दूरध्वनीमुळे मतदारांवर दबाव आहे,' अशा तक्रारी पोलिसांकडे करण्यात आल्या.