अमरावतीचा आखाडा! दिल्लीत जाण्यासाठी गल्लीत गोंधळ

जाहिरात
Read Time: 4 mins

अमरावती लोकसभेचा अक्षरश: आखाडा झाला आहे. दिल्लीत जाण्यासाठी जणू गल्लीत नुसता गोंधळ अनुभवायला मिळत आहे. अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, तर प्रहार संघटनेकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. यामध्ये मोठ्या राजकीय उलथापालथीही झाल्या आहे. अगदी सभेच्या मैदानावरून झालेला गोंधळ असो की वंचितने थेट काँग्रेसला पाठींबा देण्याचा प्रकार असो. बच्चू कडू मग थेट राणा दाम्पत्याला भिडताना, जिल्हाधिकाऱ्यांना इशारा देण्याचीबाब असो. हे सर्व घडलं आहे ते एकट्या अमरावती लोकसभा मतदार संघामध्ये. लोकसभेची निवडणूक जाहिर  झाल्यानंतर या मतदार संघाचा खरोखरच आखाडा झाला आहे. काय काय या मतदार संघात घडले त्यावर एक नजर टाकूयात. 

हेही वाचा - सुनेत्रा पवारांना क्लीन चिट, 25 हजार कोटींच्या घोटाळ्याचा होता आरोप

मैदानावरून राणा - कडू यांच्यात राडा 

अमरावतीमध्ये नवनीत राणांसाठी गृहमंत्री अमित शहा सभा घेणार आहेत. ते ज्या ठिकाणी सभा घेणार होते त्या मैदानाची परवानगी मात्र बच्चू कडूंकडे होती. मात्र ऐन वेळी सुरक्षेच्या कारणास्तव ती परवानगी नाकारण्यात आली. ती परवानगी मग नवनीत राणा यांना अमित शहांच्या सभेसाठी देण्यात आली. यावरून बच्चू कडू भलतेच भडकले. त्यांनी थेट पोलिस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केले. ही हुकुमशाही आहे. आधी परवानगी देता मग नाकारता हा कोणता प्रकार असेही ते म्हणाले. निवडणूक जिंकण्यासाठी राणा अमरावतीत दंगलीही भडकवतील असा आरोपही कडू यांनी केला. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. 

'जरा परिपक्वता दाखवा' 

राणांवर बच्चू कडू यांनी केलेल्या शाब्दीक हल्लानंतर राणांनीही पलटवार केला आहे. देशाचे गृहमंत्री प्रचाराला येत आहेत. ते देशाचे मोठे नेते आहेत. तुमच्या पक्षाचे कोणी बडे नेते आले असते तर आम्ही मैदना सोडले असते. त्यामुळे थोडी परिपक्वता दाखला असा टोला नवनीत राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला आहे.     

नवनीत राणांबाबत नाराजी 

नवनीत राणा यांना उमेदवारी मिळू नये यासाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि बच्चू कडू आग्रही होते. राणा यांच्या उमेदवारीला त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे सुरूवातीपासूनच वातावरण तापले होते. तर शिंदे गटाचे आनंदराव आडसूळ यांनी तर एक वेळ राजकारण सोडेन पण राणांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. राणांच्या उमेदवारीनंतर बच्चू कडू यांनी बंडखोरी करत आपल्या पक्षाचा उमेदवार थेट निवडणुकीच्या मैदानात  उतरवला. तर दुसरीकडे राणा दाम्पत्यांनी आडसूळ यांच्या घरी जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आडसूळांनी प्रचाराबाबत सकारात्मक विचार करू असे सांगितले होते. पण अजूनही ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचारात सहभागी नाहीत हेही तितकेच खरे आहे. 

Advertisement

अडसूळांची भूमिका गुलदस्त्यात

शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांची भूमिका अजूनही गुलदस्त्यात आहे. ते अजूनही नवनीत राणांच्या प्रचाराकडे फिरकले नाहीत. अभिजित अडसूळ यांची भेट राणा दाम्पत्यांनी घेतली. त्यावेळी राजकारणात कोणीही कायचा शत्रू आणि मित्र नसतो असे दोघांनीही यावेळी बोलताना सांगितले होते. पण त्यानंतर अडसूळांचा सक्रीय सहभाग प्रचारात दिसला नाही. त्यामुळे त्यांची भूमिका अमरावतीत महत्वाची ठरणार आहे. 

काँग्रेसची गाडी सुसाट 

एकीकडे महायुतीत वादाची किनार असताना महाविकास आघाडीत मात्र सर्वच बाबतीत आघाडी घेतली होती. उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारा पर्यंत काँग्रेसने आघाडी घेतली आहे. शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही अमरावती आल्यानंतर काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना लक्ष्य करावं लागले होते. ते विधानसभेत कधी येतात असा प्रश्न फडणवीसांनी केला होता. त्याला उत्तर देतान वानखेडे यांनी फडणवीसांना सुनावताना सत्तेत आहात मग अमरावतीचा मंजूर झालेला निधी कोणी रोखला असे सडेतोड उत्तर देत प्रचारात रंगत भरली होती. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या जिल्ह्यातील नेत्यांनी थेट काँग्रेसलाच पाठिंबा देत आंबेडकरांनाच धक्का दिला होता. 

Advertisement

अमित शहा राहुल गांधी अमरावतीत 

गल्लीत गोंधळ सुरू असताना दिल्लीतील नेते आज( बुधवार ) अमरावतीत येत आहेत.  त्याची जोरदार तयारी दोन्ही पक्षांनी केलेली आहे. काँग्रेस आणि भाजपकडून यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. तर याच वेळी प्रहार संघटनाही सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी नव्या संकल्पना साकारू शकते याची चर्चा सुरू आहे. शिवाय राहुल गांधी अमरावतीत सभा घेत आहे ही गौरवाची बाब असल्याचे नवनीत राणा यांनी म्हटले आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या कामामुळेच मला पराभूत करण्यासाठी राहुल गांधीना यावे लागत असल्याचे त्या म्हणाल्या.