- रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात तणावपूर्ण परिस्थिती आहे
- शिवसेना शिंदे गटाने वेगळी भूमिका घेतली असून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशी युती केली आहे
- मंत्री भरत गोगावले यांनी भाजपवर विश्वास ठेवण्यासंबंधी शंका व्यक्त केली आहे
प्रसाद पाटील
जिल्हा परिषद निवडणुकीची सर्वच जण जोरदार तयारी करत आहेत. अनेक जिल्ह्यात महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यात तर शिवसेना शिंदे गटाने एकला चलो रे ची भूमीका घेतली आहे. रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात विस्तव ही जात नाही. त्यामुळे शिवसेनेनं वेगळी चुल मांडली आहे. मात्र त्याच वेळी ही संधी साधत राष्ट्रवादीने भाजप बरोबर सुत जुळवलं आहे. त्यामुळे इथं राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाली आहे. त्यामुळे ही बाब शिवसेना नेते आणि मंत्री भरत गोगावले यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी यावर सडकून टिका केली आहे.
शिवसेनेचा भाजपवर भरवसा नाय काय असा प्रश्न आता रायगडात विचारला जाऊ लागला आहे. कारण इथले भाजप वाले कुणाशी कधी युती करतील हे सांगता येत नाही असं सुचक वक्तव्य शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीतील युती बाबत ते बोलत होते. शिवसेना भाजपची युती झाली पाहीजे असे वरिष्ठांचे आदेश आहेत. परंतु इथले भाजपचे नेते वरिष्ठांचे आदेश मानतात की नाही असा प्रश्न गोगावले यांनी उपस्थित केला आहे. रायगडमध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली आहे. त्याच वेळी शिवसेनेला मात्र बाजूला ठेवलं आहे.
रायगड मधील भाजप नेते आमच्याशी चर्चा करतात. युती मात्र दुसऱ्याच पक्षाशी करतात असा टोला ही या निमित्ताने गोगावले यांनी लगावला आहे. त्यामुळे दक्षिण रायगडमध्ये आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं भरत गोगावले यांनी सांगितलं. दक्षिण रायगडमध्ये थेट तटकरे विरुद्ध गोगावले अशीच लढत असणार आहे. दोघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवायची असल्यास दक्षिण रायगडमधून जास्तीत जास्त सदस्य निवडून आणावे लागतील. हा दोघांचाही तसा बालेकिल्ला समजला जातो. त्यात आता राष्ट्रवादीच्या जोडीला भाजप आल्याने गोगावलेंचे टेन्शन मात्र वाढल्याची चर्चा आहे.