Raj Thackeray Exclusive : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली असून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी युती करत सर्वांनाच धक्का दिला आहे. तब्बल 20 वर्षांनंतर हे दोन्ही भाऊ एकाच राजकीय मंचावर एकत्र निवडणूक लढवताना दिसत आहेत. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी एनडीटीव्ही मराठीला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले, मात्र उद्धव ठाकरेंशी संबंधित प्रश्नांवर त्यांनी दिलेल्या उत्तराने सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
उद्धव ठाकरेंचे प्रश्न त्यांनाच विचारा
मुलाखतीदरम्यान जेव्हा राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी मुलाखत घेणाऱ्याला ठणकावून सांगितले की, उद्धव ठाकरेंचे प्रश्न मला विचारू नका, ते त्यांनाच जाऊन विचारा. राज ठाकरे यांच्या या उत्तरामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. हे दोन्ही पक्ष युतीमध्ये एकत्र आले असले, तरी राज ठाकरे यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख आणि भूमिका कायम ठेवल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
( नक्की वाचा : Raj Thackeray: 'मुलांच्या भविष्यासाठी विकले जाऊ नका' राज ठाकरेंची नाशिककरांना साद, 15 कोटींचा केला खळबळजनक आरोप )
बाळासाहेबांच्या आशीर्वादाची खात्री
मुलाखतीत एक भावनिक क्षण तेव्हा आला जेव्हा राज ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. जर आज बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी नक्कीच माझ्या पाठीवर मायेचा हात ठेवला असता, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. ही युती केवळ राजकारणासाठी नसून एका मोठ्या उद्देशासाठी असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले. बाळासाहेबांचे संस्कार आणि विचार घेऊनच आपण पुढे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी अस्मिता आणि युतीचे गणित
राज ठाकरे यांनी या मुलाखतीत सांगितले की, मी मराठी माणसांच्या हितासाठी आणि मराठी अस्मितेसाठी एकत्र आलो आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि एमएमआरडीए क्षेत्रातील मराठी माणसांचे अस्तित्व टिकवणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. समोरच्या पक्षांनी भ्रष्टाचाराबद्दल बोलू नये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. माझ्या हातात कधीही सत्ता नव्हती, पण मला सत्ता का हवी आहे हे मी वारंवार जनतेला सांगत आलो आहे, असेही ते म्हणाले.
प्रगतीच्या नावाखालील छुपा अजेंडा
राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्द्यावरही आपले मत मांडले. त्यांनी स्पष्ट केले की, मी कोणत्याही प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. मात्र प्रगतीच्या नावाखाली जो छुपा अजेंडा राबवला जात आहे, तो मला लोकांसमोर मांडावाच लागेल. महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस हे कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मोठे आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. राज ठाकरे यांनी पुढे असेही म्हटले की, महाराष्ट्राचे अस्तित्व टिकवण्यासाठी जर डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत केली, तर मला तेही चालतील.
( नक्की वाचा : BMC Election 2026 MNS Candidate List: मनसेचे 'मिशन मुंबई'; 53 जणांना उमेदवारी जाहीर, वाचा कुणाला मिळाली संधी? )
स्वतःच्या बळावर सत्ता मिळवण्याचा विश्वास
मुंबई महापालिकेत आम्ही आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळून पूर्ण बहुमताने सत्ता मिळवू, त्यासाठी आम्हाला इतर कोणाच्याही सहकार्याची गरज पडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी कडवट मराठी आहे आणि हे संस्कार मला माझ्या वडिलांकडून, काकांकडून आणि आजोबांच्या वाचनातून मिळाले आहेत. हा माझा मुद्दा केवळ राजकारणासाठी नसून तो माझ्या विचारांचा भाग आहे, असे राज ठाकरे यांनी या मुलाखतीत स्पष्ट केले.