Raj Thackery Speech : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये पहिलीच संयुक्त जाहीर सभा घेतली. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिवसेना (उबाठा) आणि मनसे युतीच्या हाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भाजपाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपच्या सध्याच्या स्थितीवर खोचक टिप्पणी केली. 1952 साली जनसंघ नावानं जन्माला आलेल्या पक्षाला 2026 मध्ये पोरं भाड्यानं घ्यावी लागतात, अशी टीका त्यांनी केली. इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर हा मोठा अन्याय असल्याचे त्यांनी म्हटले.
निवडणुकीच्या रिंगणात उभं राहू द्यायचं नाही, दहशत घालायची आणि भीती दाखवायची अशा वातावरणात निवडणुका घेतल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. कल्याणमधील एका प्रभागातील 3 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी यावेळी केला.
( नक्की वाचा : Thackeray Brothers Interview: 'त्यांची अपेक्षाच नव्हती'; ठाकरेंनी सांगितलं युतीचं गुपित, शिंदेंबद्दल म्हणाले.. )
दत्तक विधानावरून फडणवीसांवर निशाणा
2017 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली होती. त्यावर राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. फडणवीस म्हणाले होते की नाशिक मी दत्तक घेतो, त्या भुलथापांना नाशिककर बळी पडले आणि आमची कामं विसरले. पण दत्तक घेतो म्हणणारा हा बाप नंतर नाशिककडे फिरकलाच नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सत्ताधाऱ्यांनी केवळ फोडाफोडीचे राजकारण केले असून स्वतःच्या पक्षातील झाडं छाटून बाहेरची लोकं पक्षात आणल्याची टीका त्यांनी केली.
( नक्की वाचा : Thackeray Brothers Interview: 'महापौरांनाही सुरतेला उचलून नेतील"; व्हेनेझुएलाचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंचा दावा )
नाशिकच्या कामांचा पाढा आणि कुंभमेळ्याचा संदर्भ
मनसेची नाशिकमध्ये सत्ता असताना केलेल्या कामांची आठवण राज ठाकरे यांनी करून दिली. आमच्या काळात कुंभमेळा झाला, पण त्यासाठी एकही झाड कापले नव्हते. आता मात्र झाडं का कापली जात आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. फडणवीसांनी 5 वर्षांपूर्वी दिलेली आश्वासनं राज ठाकरेंनी वाचून दाखवली आणि त्यातील एकही काम पूर्ण झाले नसल्याचा दावा त्यांनी केला.
शहरातील वाढलेली ट्रॅफिक समस्या, चांगले फूटपाथ नसणे आणि बकाल वातावरण यामुळे तरुण परदेशात जात असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरही राज ठाकरे यांनी भाष्य केले. बहिणींना दिलेले 1500 रुपये 15 दिवसातच संपून जातात, अशाने काय बदल होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला.भविष्यात तुमच्या मुलांना पश्चाताप होऊ नये, 1500 रुपयांसाठी आपले आई-वडील विकले गेले असं म्हणू नये अशी जर इच्छा असेल तर शिवसेना-भाजपच्या नगरसेवकांना निवडून द्या असं आवाहनही राज यांनी केलं.
2017 च्या पराभवाचे शल्य व्यक्त करताना ते म्हणाले की, नाशिकसाठी इतकं करूनही पराभव झाला याचे वाईट वाटते. मात्र, आता पुन्हा नाशिकमध्ये चमत्कार घडवायचा आहे. समोर असलेल्या क्रिकेटच्या स्कोअर बोर्डचा संदर्भ देत त्यांनी नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेचे मिळून 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून द्या, असं आवाहन राज यांनी केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world