तेव्हा ही अक्कल का आली नाही ? करकरेंच्या मृत्यूवरून प्रश्न विचारणाऱ्या काँग्रेसला राज ठाकरेंचा सवाल

वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत. निकम यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतरच वडेट्टीवारांना हा साक्षात्कार कसा झाला, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

Advertisement
Read Time: 3 mins
राज ठाकरे यांनी काँग्रेसला प्रश्न विचारला आहे.
मुंबई:

26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांना वीरमरण आले होते.  या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफ यांच्या पुस्तकाचा दाखला देत आरोप केला होता. करकरे यांना लागलेली गोळी ही दहशतवादी कसाब याच्या बंदुकीतून सुटलेली नव्हती,  ती गोळी आरएसएस समर्थक एका पोलीस अधिकाऱ्याच्या बंदुकीतील होती. हे पुरावे लपवणारे देशद्रोही उज्ज्वल निकम होते असाही आरोप वडेट्टीवारांनी केला होता. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुढे आले आहेत. निकम यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतरच वडेट्टीवारांना हा साक्षात्कार कसा झाला, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

राज ठाकरे यांनी व़डेट्टीवार आणि काँग्रेस यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की,  "26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांबद्दल काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी वाट्टेल ती विधानं केली आहेत. या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्या गोळ्या झेलल्या त्या कसाबच्या बंदुकीतल्या नव्हत्या, तर दुसऱ्याच कोणाच्या बंदुकीच्या होत्या. वडेट्टीवारांना हा साक्षात्कार नेमके श्री. उज्वल निकम हे उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतानाच कसा झाला? समजा उज्वल निकम हे उमेदवार नसते तर वडेट्टीवारांना हा साक्षात्कार झाला असता का?

बरं, 2008 ला मुंबईवर जो अतिरेकी हल्ला झाला, त्याला जबाबदार तेंव्हाच काँग्रेसचं सरकार. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सरकार, राज्याचा मुख्यमंत्री यांच्या पक्षाचा, देशाचा गृहमंत्री यांच्या पक्षाचा, या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून श्री. उज्वल निकम यांची नियुक्ती यांच्या सरकारनेच केली. हा खटला उज्वल निकम सरकारच्या वतीने कसा नेटाने लढवत आहेत, म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणारा काँग्रेस पक्ष यांचाच. मग ही अक्कल तेंव्हा का नाही आली?

( नक्की वाचा : मुंबईतील 'या' लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

समजा वडेट्टीवार म्हणतात तसं या गोळ्या जर दुसऱ्या कोणाच्याच बंदुकीतल्या होत्या, तर मग याची चौकशी काँग्रेसने का नाही केली? का काँग्रेसलाच काही लपवायचं होते का? आणि इतकी संवेदनशील माहिती देशापासून लपवून, देशाच्या अंतर्गत सुरक्षेला काँग्रेसने खिंडार पाडलं, असं म्हणलं तर काय चुकलं?

Advertisement

या देशातील लोकं 26/11 चा ना भीषण हल्ला विसरलेत, ना त्यावेळेचा ढिसाळ कारभार. त्यामुळे काँग्रेसला जर प्रचारात, मुद्दे सुचत नसतील तर त्यांनी गप्प बसावं पण उगाच पोलीस अधिकाऱ्यांच्या बलिदानाला कमी लेखण्याचं काम करू नये व कसाबसारख्या अतिरेक्याला कांग्रेस ने पाठीशी घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. मी सगळ्यांना आव्हान करतो की काँग्रेसला मुंबईतुनच नव्हे तर महाराष्ट्रातूनच हद्दपार करावे आणि उज्ज्वल निकमांसारख्या देशभक्ताला भरघोस मतांनी निवडून द्यावे."