जाहिरात
This Article is From May 16, 2024

मुंबईतील 'या' लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) या दोन्ही नेत्यांसाठी मुंबईतील हा मतदारसंघ महत्त्वाचा आहे.

मुंबईतील 'या' लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
शिवसेनेच्या दोन्ही गटांची या लोकसभा निवडणुकीत मोठी परीक्षा आहे.
मुंबई:

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) आता अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या सामर्थ्याची परीक्षा देखील होणार आहे. दोन्ही गटांसाठी राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. पण, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विजय मिळवणे हा या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे उभे आहेत. शेवाळे यांची लढत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या अनिल देसाई यांच्याशी होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बाळासाहेब ठाकरे कनेक्शन

मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे. या सभेची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. है मैदान अनेक राजकीय घडामोडी आणि स्थित्यंतराचं साक्षीदार आहे. मुंबईच्या मध्य वस्तीमधील हे मैदान शिवसेनेची ओळख होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या स्थापनेनंतर सर्वात पहिली सभा शिवाजी पार्क मैदानातच घेतली होती. जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली. शिवाजी पार्कचं हे ऐतिहासिक मैदान दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातच येतं. 

( नक्की वाचा : क्रिकेट ते राजकारण... ऐतिहासिक घटनांचं आहे मुंबईतील 'हे' मैदान साक्षीदार )
 

शिवसेना भवन

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाचं अधिकृत नाव आणि निवडणूक चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातामधून निसटलंय. पण, शिवाजी पार्काच्या समोर उभ्या असलेल्या शिवसेना भवनाचा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडं ताबा आहे. गेल्या अनेक दशकांपासून हे शिवसेनेचं मुख्यालय आहे. शिवसेनेचं हे मुख्यालय याच मतदारसंघात आहे. पण, येथील खासदार राहुल शेवाळे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. 

राहुल शेवाळेंचा दावा

लोकसभा निवडणुकांना आता कमी दिवस उरले आहेत. त्यामुळे विद्यमान खासदार राहुल शेवाळे सध्या कॉर्नर सभांना भर देतायत. माझा सामना ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाशी असला तरी खरी लढत ही काँग्रेस विचारांशी आहे, असा दावा शेवाळे यांनी केलाय.  

अनिल देसाईंचा दावा

उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून त्यांचे निकटवर्तीय अनिल देसाई यांना मैदानात उतरवलं आहे. देसाई पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. दक्षिण मध्य मुंबईतील मतदार उद्धव ठाकरे यांना साथ देतील असा त्यांना विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं त्याचा लोकांमध्ये राग आहे. तो राग मतदानाच्यावेळी दिसेल, असा दावा देसाई यांनी केलाय. 

( नक्की वाचा : मुंबईकरानं वाढत्या कराबाबत केली थेट अर्थमंत्र्यांकडं तक्रार, पाहा काय मिळालं उत्तर )
 

आणखी काही कारणांमुळेही रंगत

मुंबई म्हंटलं की बहुतेकांना गेट-वे-ऑफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह हे आठवतं. मुंबईचा हा लँडमार्क परिसर पाहण्याची शहरात आलेल्या प्रत्येकाची इच्छा असते. पण, धारावी हा देखील मुंबईचा एक लँडमार्क आहे. झगमगत्या मुंबईच्या अगदी विरुद्ध चित्र धारावीमध्ये दिसतं. आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीसाठी ही महत्त्वाची निवडणूक आहे.

एकनाथ शिंदे सरकारनं धारावाीच्या पुनर्विकासास मंजूरी दिलीय. 600 एकर परिसरातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या धारावीकरांना आता पक्की घरं तसंच सध्यापेक्षा जास्त जागा मिळणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा धारावी पुनर्निमाण योजनेला विरोध आहे. निवडणुकींच्या समीकरणांचा विचार केला तर मनसेनं महायुतीला पाठिंबा दिल्यानं या मतदारसंघातील निवडणूक आणखी रंगतदार झाली आहे. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com