तन्मय टिल्लू
Thackeray-Pawar Alliance Inside Story : मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका 7 ते 10 वर्षांच्या विलंबाने पार पडत आहेत. खरंतर महापालिकांच्या निवडणुकांचं बिगुल कधी वाजणार याचा अंदाज गेल्या काही वर्षांपासून उमेदवारांसह मतदारांनीही लावणं सोडून दिलं होतं.दुसरीकडे न्यायालयीन प्रक्रीयेतून अखेर अनपेक्षितपणे या निवडणुका आता 15 जानेवारी रोजी होऊ घातल्या आहेत.असं असलं तरी केंद्रासह राज्याच्या राजकारणात झालेले बदल हे अनाकलनीय आहेत.2019नंतर राजकारणात ‘असंच घडेल' किंवा ‘असं घडणार नाही' असं छातीठोकपणे सांगण्याची हिंमत आता कोणातच उरलेली नाही,अशा कल्पनातीत जोड्या जुळल्याही आहेत आणि तुटल्याही…त्यामुळे महापालिका निवडणुकीत काही वेगळे ट्विस्ट अपेक्षितचं होते.घडलंही तसंच! मात्र, महापालिका निवडणुकांसाठी झालेलं हे ‘मनोमिलन'समजायचं की राजकीय पटलावर जीवंत राहण्याची केविलवाणी धडपड?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधात असताना एका मुलाखतीत एक वाक्य म्हणाले होते, ‘राजकारणात जीवंत राहण्याला महत्त्व असतं'...आज काहीशी तशीच धडपड राज्यातील दोन घराणी अर्थात ठाकरे घराणं आणि पवार घराणं करताना पाहायला मिळत आहे. मुळात, मोदी-शाह कृत भाजपच्या आक्रमक हिंदुत्ववादी राजकारणापुढे देशातील राजकीय घराणेशाहीला सुरुंग लागल्याची अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षात अधोरेखित झाली. या राजकारणात भाजपला कधी यश आलं तर कधी अपयश मात्र बदलेल्या राजकारणाची झळ या राजकीय घराण्यांना बसलीच..अर्थात भाजपमध्येही घराणेशाही आहेच..पण तरीही या बदलत्या राजकारणात जीवंत राहण्याचा या घराण्यांचा संघर्ष, धडपड किंवा लढाई हे समकालिन राजकारणाचं वैशिष्ट्य आहे.
मुंबईत 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंचं एकत्र
घराणेशाही ही भारतीय शास्त्रीय संगीतात जशी जपली, रुजली गेली तशीच कालांतराने राजकीय पटलावरही संस्थाने तयार झाली. मुळात, घराणेशाहीचा संघर्ष हा वैचारिक जितका आहे तितकाच तो टिकून राहण्याचा असतो हेच यातून सिद्ध होतं. त्यातूनच मुंबईत 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि पुण्यात एकाच घरातील नणंद - भावजय एकमेकांविरुद्ध येऊनही पुन्हा मनोमिलनं होणं ही याचीच उदाहरणं…मुंबईत ठाकरे बंधुंची युती ही वरकरणी पाहिल्यास राजकीय अपरिहार्यता आहे. त्याची कारणंही ठळक आहेत. अर्थात शिंदेंच्या बंडानंतर ठाकरेंना मोठा धक्का बसला, दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेत संघटनात्मक अडचणींचा डोंगर आहे. साहजिकच दोघांच्या पक्षातून कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांचं आऊटगोईंग सर्वाधिक आहे.
नक्की वाचा >> Devendra Fadnavis: "अकोल्यातील लाडक्या बहिणींसाठी गूड न्यूज...", प्रचारसभेत CM फडणवीसांचं सर्वात मोठं विधान!
त्यामुळे आजारापेक्षा कडू औषध घेणं अधिक श्रेयस्कर हे ठाकरे जाणतात. नाईलाजाने का होईना पण मनोमिलनाची गरज दोघांनाही जाणवली आणि दोघांनीही एकमेकांचा हात धरला. आता याच घटनेला राजकीय चष्म्यातून पाहायचं झाल्यासं भाजपला एकहाती सत्तेपासून लांब ठेवणं हे उदिष्ट ठाकरे बंधूंना ठेवावं लागेल. तरी मनोमिलनाला उशिरंच झाला असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात आहे. याला महत्त्वाची कारणे आहेत. उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय मराठी माणूस याआधीच हिंदुत्वाच्या, विकासाच्या मुद्द्यावर भाजपने आपल्याकडे वळवला आहे. तर उर्वरीत शिंदेकडे झुकला आहे.
राज ठाकरे यांची बदलती भूमिका
दुसरीकडे मनसेची आणि विशेषतः राज ठाकरे यांची बदलती भूमिका त्यांच्याच विरोधात जाणारी आहे. ‘ये पब्लिक है, सब जानती है…' हे बहुदा राज ठाकरे विसरले असावेत. लोकसभेत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे नंतर पुन्हा बदलले. त्यांच्या या धरसोड वृत्तीचा फटका या मनोमिलनाला बसल्याशिवाय राहणार नाही. राहता राहीला प्रश्न भावनिक आवाहनाचा…मात्र आता या मुद्द्यावर ठाकरेंचे स्वतःचे मतदारसंघ सोडल्यास ठाकरेंची मदार नव्याने जोडला गेलेला मुस्लिम समाज, दलित समाजावर असेल. मतांची विभागणी कमी झाल्याने कमीअधिक प्रमाणात ठाकरे बंधूंना फायदा होईल असं म्हणता येईल..अर्थात ठाकरेंच्या ‘शब्दाला' मुंबईकर मराठी माणूस किती साथ देणार हे निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल.
नक्की वाचा >>मुंबईला स्वप्नांची मायानगरी का म्हणतात? घर सोडून मुंबईत गेलेल्या तरुणानं करून दाखवलं, Video पाहून हिंमत वाढेल
दुसरीकडे सर्व्हायवलच्या धडपडीत असलेलं दुसरं आणि राजकारणातील सर्वात मात्तब्बर घराण अर्थात पवार घराणं…खरंतर 2019 च्या पहाटेच्या शपथविधीचं बंड झालं तेव्हापासूनच भाजप हा आपला मित्रपक्ष असावा असं मत एकसंध राष्ट्रवादीतील अनेकांचं होतं. ते बंड लगेचंच शमलं..पुढे एकसंध राष्ट्रवादीने महाविकास आघाडी म्हणून राजकारणंही केलं ही बाब अलाहीदा.. मात्र त्यानंतर काहीच दिवसांत शरद पवारांच्या ‘निवृत्ती' जाहीर नाट्यात याच भावनेनं उचल खाल्ली. 2024 उजाडताच अजित पवारांनी दुसरं बडं केलं.
पवार कुटुंबाने विविध कार्यक्रमात लावली हजेरी
यंदा त्यांच्यासोबत गेलेले अनेकजण पुन्हा माघारी फिरले नाहीत. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होत, ‘कायमच सत्तेत राहणारा पक्ष' अशी बिरुदंही मिळवली. अशातच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये दोन राष्ट्रवादीमधील पक्षीय स्पर्धा थेट पवार कुटुंबियांपर्यंत पोहोचली. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार ही राजकीय लढत पवारांच्या कुटुंबात घडेल याचा विचारही कोणी केला नाही. त्यानंतरही पवार कुटुंब विविध कार्यक्रमात एकत्र हजेरी लावताना दिसून आलं.
आता दोन्ही राष्ट्रवादींना वेगवेगळ्या आघाड्यंवर लढताना अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतंय. विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये जिथे महायुती नाही अशा ठिकाणी सर्व जागा स्वबळावर लढणं दोघांनाही अशक्य आहे. विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी…त्यामुळे आपलाच बालेकिल्ला राखायचा असेल तर एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही हे न कळण्याइतके ‘पवार' नवखे नाहीत… शिवाय प्रश्न भविष्याचा आहे…नेतृत्वाचा आहे… त्यामुळे महानगरपालिका ही विलिनीकरणाची नांदी आहे असं म्हणण्यास नक्कीच वाव आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषतः सहकार क्षेत्र ही राष्ट्रवादीची बलस्थानं आहेत किंवा तो पक्षाचा कणा आहे असंही म्हणता येईल. मात्र गेल्या काही काळात पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत आहे. सहकारातील पकड भाजप मजबूत करत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील आपलेच बालेकिल्ले वाचवायचे असतील तर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. ठाकरे असो वा पवार, बदलणाऱ्या राजकीय परिस्थितीत त्यांना करावी लागणारी ही तडजोड, धडपड किंवा अगदी मनोमिलन हे एकत्र आलो तरच टिकून राहता येईल हे सांगणारी निवडणूक ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world