विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं आहे. महायुतीमध्ये भाजपाला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) 57, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 41 जागा मिळाल्या आहेत. महायुतीला दणदणीत बहुमत मिळाल्यानंतरही कोण मुख्यमंत्री होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही.
भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्यानं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं अशी भाजपा नेत्यांची मागणी आहे. तर एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं यासाठी त्यांच्या पक्षातील नेते आग्रही आहेत. त्यामुळे राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? हा संभ्रम कायम आहे. हा संभ्रम कायम असतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवी मागणी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्री करावं, अशी मागणी आठवले यांनी केलाय. एकनाथ शिंदेंबद्दल आम्हाला आदर आहे. ते सक्रीय नेते आहेत. ते 50 आमदारांना घेऊन आले त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं. पण ज्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या त्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही हे सूत्र होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस याांना मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्री करावं अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात भाजपाला जास्त जागा मिळाल्या. त्यात एकनाथ शिंदेंचा वाटा आहे, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळालेल्या यशात फडणवीसांचा वाटा आहे. मतदारांनी भाजपालाच कौल दिल्यामुळे मुख्यमंत्री त्यांचाच असावा, अशी मागणी त्यांनी केली. आम्हाला एक विधानपरिषद आणि एक मंत्रिपद देण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळात आरपीआयचा एक मंत्री असेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
( नक्की वाचा : Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा परिणाम किती झाला? )
बिहार फॉर्म्युला नाही
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा कमी जागा मिळूनही जनता दल युनायटेडचे नेते नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. हा फॉर्म्युला राज्यात शक्य नाही, असं आठवले यांनी स्पष्ट केलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री होतील, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. तो शब्द पाळण्यासाठीच भाजपानं बिहारमध्ये जास्त जागा जिंकूनही नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं.
EVM हे काँग्रेसच्या काळातच सुरु झाले. अनेक देशांमध्ये EVM नं मतदान होत आहे. काही गैरप्रकार असेल तर त्याबाबत निवडणूक आयोग चौकशी करावी, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं. लोकसभेच्या निवडणूकीत ज्यांना जागा मिळाल्या तेच आता विधानसभेत ईव्हीएमच्या नावानं ओरडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.