धाराशिव लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये बंडाची लागण लागण्याची दाट शक्यता आहे. हा मतदार संघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाला मिळावा असे प्रयत्न होते. मात्र तसे न होता हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गेला. तर उमेदवार हा राष्ट्रवादीने भाजपकडून आयात केला. त्यामुळे शिंदे गटाचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे माजी खासदार बंडाच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज घेतला आहे. अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची त्यांची तयारी आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाठी हा मोठा धक्का समजला जाईल. शिवाय महायुतीच्या उमेदवारालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
माजी खासदार रविंद्र गायकवाड बंडाच्या तयारीत
धाराशिव लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळाली आहे. त्यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारीही जाहीर केली आहे. मात्र या मुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार रविंद्र गायकवाड हे नाराज आहेत. ते या मतदार संघातून शिवसेनेकडून लढण्यास इच्छुक होते. मात्र मतदार संघ न सुटल्याने त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. 2014 च्या निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर विजयी झाले होते. दरम्यान त्यांनी उमेदवारीचे चार अर्ज घेतले आहे. ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - नवनीत राणा अडसूळांच्या भेटीला, चर्चा काय झाली?
बंडखोरीचा फटका कोणाला?
शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना रविंद्र गायकवाड यांनी साथ दिली. तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरें बरोबरच राहीले. त्यामुळे आगमी लोकसभा निवडणुकीत आपल्यालाच संधी मिळेल असे रविंद्र गायकवाडांना वाटत होते. तशी तयारीही त्यांनी सुरू केली होती. मात्र त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. गायकवाड यांची मतदार संघात चांगली ताकद आहे. ते उमरगा विधानसभेतून दोन वेळा आमदार झाले होते. त्यामुळे त्यांच्या नाराजीचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गायकवाडांची समजूत काढण्याची जबाबदारी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर येवून ठेपली आहे.
हेही वाचा - ठाण्याचा 'नायक' ठरला? शिंदेंचा जवळच्या नेत्या सिग्नल मिळाला?
धाराशिवमध्ये शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी थेट लढत
धाराशिव लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांनी अर्चना पाटील यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे इथे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. विशेष म्हणजे ओमराजे निंबाळक हे अर्चना पाटील यांचे दिर आहे. त्यामुळे दिर भावजय अशी लढत या मतदार संघात होत आहे.