बारामती लोकसभा मतदार संघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदार संघात सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत होत आहे. मात्र खरी लढत ही शरद पवार विरूद्ध अजित पवार अशीच आहे. अशी वेळी संपुर्ण पवार कुटुंब हे प्रचारात उतरलं आहे. सुप्रिया सुळेंसाठी स्वत: शरद पवार मेहनत घेत आहेत. तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार घाम गाळत आहेत. अशा वेळी आता कुटुंबातील आणखी एका व्यक्तीची प्रचारात एन्ट्री झाली आहे. ती म्हणजे रेवती सुळे यांची. रेवती या सुप्रिया सुळेंच्या कन्या आहेत.
हेही वाचा - शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'शपथनामा प्रकाशित', 'ही' आहेत 5 प्रमुख आश्वासने
रेवती सुळे उतरल्या रस्त्यावर
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी संपुर्ण पवार कुटुंब उतरलं आहे. या आधी शरद पवार, प्रतिभा पवार, रोहीत पवार आणि युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांचा प्रचारासाठी उतरले होते. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. ती म्हणजे रेवती सुळे यांची. रेवती सुळे या सुप्रिया सुळे यांच्या कन्या आहेत. त्यांनी आज बारामतीतमध्ये प्रचार फेरीत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी संपुर्ण बारामतीत फिरून आईसाठी मतांचा जोगवा मागितला. शिवाय त्या बारामतीतल्या दर्ग्यावरही गेल्या होत्या. या पदयात्रेत त्यांच्या बरोबर युगेंद्र पवारही होते. रेवती या फार कमी वेळा राजकीय व्यासपिठावर दिसल्या आहेत.
हेही वाचा - मतदानापूर्वीच हिंसाचार, लग्नसोहळ्यावरून परतणाऱ्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीमध्ये पहिल्यांदाच शरद पवारांसमोर आव्हान उभं ठाकलं आहे. लेकीला निवडून आणण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न करावे लागत आहेत. अजित पवारांनी बंड केल्यामुळे होमपिचवरच त्यांना आव्हानाला समोरे जावे लागत आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या मदतीला सर्वच पवार कुटुंब सरसावले आहे. आता पर्यंत पवारांनी निवडणुकीत पराभव पाहिलेला नाही. त्यामुळे यावेळीही विजय नोंदवायचाच हे आव्हान त्यांच्या समोर आहे. त्यामुळे शरद पवारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अजित पवारांनी उभं केले तगड आव्हान
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या ताब्यात घेऊन वेगळी चुल थाटली आहे. बारामतीत त्यांनी पत्नी सुनेत्रा यांना उभे केले आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. संपुर्ण कुटुंब सुप्रिया सुळेंच्या प्रचारात असताना अजित पवारांबरोबर पार्थ पवार आणि जय पवार ही मुलं आहेत. शिवाय महायुतीची ताकदही अजित पवारांच्या मागे आहे. जशी ही निवडणूक शरद पवारांसाठी प्रतिष्ठेची आहे तशीच ती अजित पवारांसाठीही प्रतिष्ठेची आहे. बारामतीत पराभव हा अजित पवारांचा पराभव असेल. त्याचा परिणाम पुढच्या राजकीय वाटचालीवर होऊ शकतो याची कल्पनाही अजित पवारांना आहे.