लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) चे निकाल लागले आहेत. या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं 293 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलंय. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार हे स्पष्ट झालंय. मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आम्ही मिठाई वाटू, असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केलंय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले संजय राऊत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील त्यानंतर आम्ही मिठाई वाटू कारण, हे सरकार फार टिकणार नाही. असं संजय राऊत यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे, असा दावाही राऊत यांनी केला. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपाचा पराभव झाला असेल तर उत्तर प्रदेशात योगींच्या नेतृत्त्वात झाला. त्यामुळे फडणवीस राजीनामा देण्याचं वक्तव्य करत आहेत. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )
राऊत यांचा सत्तास्थापनेचा प्लॅन
यापूर्वी संजय राऊत यांनी इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. आमच्याकडे आकडे आहेत, असं वक्तव्य केलं आहे. आमच्याकडे ही आकडे आहेत. आम्हीही 250 पर्यंत पोहचलो आहोत असेही ते म्हणाले. अशा स्थितीत नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी ठरवायचे आहे की त्यांना कोणा बरोबर राहाचे आहेत. त्यांनीही मोदी आणि भाजप विरोधात संघर्ष केला आहे, असं राऊत यांनी सांगितलं.
मोदी ब्रँड आता संपल्याचा दावाही राऊत यांनी केला. संविधान वाचवण्यासाठी आणि हुकुमशाही मोडण्यासाठी आम्ही लढा दिला. इंडिया आघाडीत नेतृत्व कोण करणार याबाबत मतभेद नाहीत. राहुल गांधी तयार असतील तर ते आघाडीचे नेते होतील. त्याला कोणाचाही विरोध नसेल असेही राऊत स्पष्ट केले.