पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'महाराष्ट्र अतृप्त आत्म्याचा शिकार झालाय' या वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य करताना कुणाचंही नाव घेतलं नाही. तसेच मी जे बोलतोय ते कोणी स्वत:हून आपल्या डोक्यावर घेऊ नये, असंही मोदींनी म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदी यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याची चर्चा कालपासून सुरु झाली होती.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जाणकारांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोख शरद पवार यांच्याकडे होता. मोदींच्या या वक्तव्याला आता शरद पवार यांनी देखील रोखठोक उत्तर दिलं आहे. शिरूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथील सभेत शरद पवार बोलत होते. तिथे त्यांनी म्हटलं की, होय मी भटकती आत्मा, जनतेसाठी मी शंभर वेळा अस्वस्थ राहीन.
पंतप्रधान काल म्हणाले ईडीचा मी एक टक्कादेखील वापर करत नाही. जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना तुम्ही तुरुंगात टाकता. आता तुम्ही एक टक्का म्हणा की आणखी काय म्हणा. तुम्ही हुकूमशाहीच्या दिशेने जाताय. जनतेला अडचणीतून दूर करण्यासाठी सत्तेचा वापर करायचा असतो. मात्र इथे अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला जातोय, अशी टीका शरद पवार यांनी केली.
(नक्की वाचा- '...ते चिंधी चोर, मंत्रालयही गुजरातला नेऊन ठेवतील' ठाकरे भडकले)
माझ्या बोटाला धरून राजकारणात आलेले, आता माझ्या बद्दल काय बोलत आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. एक आत्मा भटकत आहे, असं तुम्ही म्हणाले. त्या आत्म्यापासून सुटका व्हायला हवी, असं मोदी म्हणाले. पण हा अस्वस्थ आत्मा स्वतःसाठी नाहीतर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, महागाईतून जनतेची सुटका करण्यासाठी आहे. यासाठी मी शंभरवेळा अस्वस्थता दाखवेन. हे संस्कार यशवंतराव चव्हाणांचे आहेत, त्यात आम्ही तडजोड करणार नाही, असं देखील शरद पवार म्हणाले.
(नक्की वाचा : Explainer: अश्लील व्हिडिओ स्कँडलमध्ये अडकले माजी पंतप्रधानांचे नातू, तक्रार दाखल होताच का सोडला देश? )
काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?
आमच्याकडे म्हणतात की काही अतृप्त आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात त्यांचे आत्मे फिरत राहतात. स्वत:चं काम नाही झालं तर त्यांना इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना आनंद मिळतो. महाराष्ट्रही अशा अतृप्त आत्म्यांचा शिकार झाला आहे. मी जे बोलतोय ते कोणी स्वत:हून आपल्या डोक्यावर घेऊ नये, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.