आदित्य ठाकरे हे कल्याण लोकसभेचे शिवसेना उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खरपूस समाचार घेतला. शिवाय भाजपलाही त्यांनी लक्ष केले. श्रीकांत शिंदे यांची लायकी काय आहे असा प्रश्न करत त्यांना आपण जास्त किंमत देत नाही असे ते म्हणाले. शिवाय त्यांचा उल्लेख चिंधी चोर असाही केला. ठाकरे यांनी शिंदेंच्या गडात येऊन असे वक्तव्य केल्यानं आता त्याला काय प्रत्युत्तर मिळतं ते पहावं लागणार आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'...ते तर चिंधी चोर'
श्रीकांत शिंदे हे वारंवार तुमच्यावर टिका करतात. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांचा पारा चढला. त्यांची लायकी तेवढीच आहे अशा शब्दात आदित्य यांनी फटकारले. शिवाय त्यांना आपण किंमत देत नाही असेही ते म्हणाले. टिका करण्या पेक्षा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आपण चॅलेंज दिलं होतं. त्यांनी आपल्या बरोबर डिबेट करावी. राज्यातले उद्योग बाहेर का गेले? शेती, रोजगार, यात राज्याची पिछेहाट का झाली? या प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यावीत. मात्र तसं करण्याची त्यांची हिंमत नाही. मग अशा वेळी काही चिंधीचोरांना पुढे करून बोलायला लावलं जातं असा घणाघात ठाकरे यांनी केला. डरपोक गद्दार गँग विरोधात हा लढा असल्याचेही ते म्हणाले. सर्व काम त्यांनी गुजरातमध्ये पाठवलं आहे. तेच त्याचं काम आहे. अशा शब्दात आदित्य यांनी शिंदे पिता पुत्राला फटकारलं.
हेही वाचा - माजी मंत्र्याने लावली 9 लाखांची पैज ! पैज हरल्यास द्यावे लागतील सव्वा तीन लाख
भाजपलाही ठाकरेंनी सुनावले
एकीकडे शिंदेंवर हल्लाबोल करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपलाही लक्ष्य केलं. भाजपला प्रचाराचा रंग बदलला आहे. ते आता हिंदू मुस्लिम करत आहे. हे तर त्यांच्या पराभवाचे इंडिकेटर्स आहेत. ज्या वेळी भाजपच्या लक्षात येते की आपण निवडणुकीत मागे पडतोय. त्यावेळी त्यांच्याकडू हिंदू मुस्लिमचे अस्त्र काढले जाते अशी टिका ठाकरे यांनी केली. दरम्यान कर्नाटकमधील भाजपचा मित्र पक्ष असलेल्या जनता दल (सेक्लुलर ) च्या नेत्यावर जे लैंगिक शोषणाचे आरोप झालेत त्याबद्दल भाजप काही बोलत नाही. त्याचा प्रचार भाजपने तिथे जाऊन केलाय. शिवाय महिला कल्याण मंत्री सध्या कुठे आहेत? राष्ट्रीय महिला आयोग कुठे आहे असा प्रश्नही यानिमित्ताने ठाकरे यांनी केला.
शरद पवारांवरील टिकेला ठाकरेंचे उत्तर
पुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा नाव न घेता भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावरही आदित्य यांनी प्रतिक्रीया दिली. असं वक्तव्य करणं हे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. पवार साहेबाचं वय पाहात त्यांच्या सारख्या नेत्याबद्दल असे वक्तव्य करणं हे चुकीचे आहे. कुणीही अशा पद्धतीची टिका करू नये असंही ते म्हणाले.
श्रीकांत शिंदेंचेही प्रत्युत्तर
श्रीकांत शिंदेंनीही आदित्य ठाकरे यांच्या टिकेला उत्तर दिले आहे. निवडणूक आहे. त्यामुळे त्यांना रोड शो करावे लागतील. पण चार तारखेला त्यांना समजले. जनता कोणाच्या बाजूने आहे. कल्याणमध्ये गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात कामं झाली आहेत. त्यामुळे जनता यावेळी माझा मागे उभी राहील आणि मोठ्या फरकाने विजयी करेल असे श्रीकांत शिंदे म्हणाले. ते कोल्हापुरात प्रचारा निमित्त आले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world