राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी लातूर इथं झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. लोकसभा निवडणुकीत मोदींनी 400 पारचा नारा दिली होता. त्याच वेळी आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. चारशे जागा जिंकल्यावर त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला बदलायचे होते. त्यावर संस्कार करायचे होते. मात्र महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा हा डाव उधळवून लावला. मोदींना त्यांची जागा तुम्ही दाखवून दिली अशा शब्दात शरद पवारांनी मोदींना सुनावलं आहे. शिवाय मोदींच्या भूमीकेवरही शंका उपस्थित करत त्यांना पंतप्रधानपदावर रहाण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्नही उपस्थित केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अस्वस्थ होता. त्याला काही तरी बदल हवा होता. मोदींच्या मनात मात्र वेगळ्या गोष्टी सुरू होत्या. त्यावेळी राहुल गांधींच्या नेतृत्वात देशात इंडिया आघाडीने आकार घेतला. मोदी 400 पारचा नारा देत होते. त्यावेळी काही तरी गडबड असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांच्या मनात संविधान बदलण्याचा डाव सुरू असल्याचे समोर आले. चारशे जागा मिळाल्या असत्या तर त्यांना संविधानावर संस्कार करायचे होते. त्यांनी तसे केले असते तर सर्वांच्याच मुलभूत अधिकारांवर मर्यादा आणण्याचे काम होणार होते. मात्र मोदींचे हे मनसूबे महाराष्ट्रातल्या जनतेने उधळवून लावले. महाराष्ट्रातल्या जनतेने मोदींना त्यांची जागा दाखवून दिली असे पवार म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन
गेली दहा वर्ष भाजप विचारांचे सरकार राज्यात आहे. अनेक प्रश्न राज्यात आहेत. हे राज्य उद्योग, शेती या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर होते. तेच आता सहाव्या क्रमांकावर गेले आहे. या सरकारने राज्याला शोभेल अशी कामगिरी केली नाही. या आधीच्या नेत्यांनी मग विलासराव असतील किंवा मी स्वत: असेन आम्ही राज्य सतत पहिल्या क्रमांकावर ठेवले होते. पण सध्याच्या राज्यकर्त्यांना ते जमले नाही. राज्यातले कारखाने बाहेर जात आहेत. इथल्या मुलांच्या नोकऱ्यांवर डल्ला मारला जात आहे. कांदा, साखर, सोयाबीन सारख्या पिकांच्या निर्यातीवर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही यांना सत्तेपासून दुर केले पाहीजे असे पवार म्हणाले.
दरम्यान आजचं सरकार गमतीचं आहे. महाराष्ट्राचा उद्योग गुजरातला जात आहेत. पंतप्रधान हा देशाचा असतो. तो कधी ही कोणत्या राज्याचा प्रांताचा नसतो. पण मोदींचे वर्तन तसे आहे का? असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे अशा पंतप्रधानाना सत्तेवर राहाण्याचा अधिकार कितपत आहे, याचा विचार करण्याचा वेळ आली आहे. असेही पवार यावेळी म्हणाले. राज्यातला शेतकरी सध्या संकटात आहे. त्यांच्याकडे सरकारचे लक्ष नाही. जो शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही. हा निकाल आता घ्यावा लागेल असे शरद पवार म्हणाले.
राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बदलापूर सारखी घटना राज्यात होत आहे. एका चिमुकलीवर तिथे असत्याचार झाले. हजारो मुली गायब झाल्या आहे. त्यांचा पत्ता लागत नाही. तरीही या सरकारला काही पडले नाही. सत्ताधारी पक्षातला आमदार पोलिस स्टेशनमध्ये जावून गोळीबार करतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती काय आहे हे समजते. त्यामुळे राज्य महाविकास आघाडीच्या हातात द्या. या महाराष्ट्राचा चेहरा बदलू टाकू असे शरद पवार म्हणाले.