अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांच्याविरोधात बंड केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवारांच्या या निर्णयामुळे आजवर एकत्र असलेल्या पवार कुटुंबातील मतभेदही समोर आले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात तर सुप्रिया सुळे यांना अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आव्हान देणार आहेत. बारामतीच्या लढतीकडं सर्व देशाचं लक्ष लागलंय. या लढतीपूर्वी अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार आणि भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांच्या विरोधात मत व्यक्त केलंय. त्यानंतर आता शरद पवारांच्या बहीण सरोज पाटील यांनी या प्रकरणात मत व्यक्त केलंय. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
काय म्हणाल्या सरोज पाटील?
“लोकांनी चिंता करू नये. उगीच गट फुटला, पवार कुटुंबात फूट पडली अशी चर्चा करू नका. काही होत नाही. निवडणुका होतील. जे निवडून यायचे आहेत ते येतील. आम्ही नेहमी राजकीय चपला बाहेर काढून घरात येतो. एनडी पाटील आणि शरद पवार हे दोन अत्यंत वेगळ्या विचारसरणीचे लोक आहेत. पण
“एनडी पाटील निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा माझ्या आईने त्यांना 10 हजार रुपये दिले होते. पण आम्ही कधीच राजकारण घरात आणत नाही. शरद पवारांचं मी पाहिलं आहे. स्वत:च्या ताटापेक्षा बहिणींच्या ताटात सर्वकाही आहे का हे पाहतात. असं सुसंस्कृत कुटुंब असताना तिथे काहीही होणार नाही. मला तसं अजिबात वाटत नाही. अजित काय बोलला, श्रीनिवास काही बोलले तर ते राजकारणापुरते आहे. निवडणुका संपल्या की सगळे ढग निघून जातील”, असं विधान यावेळी सरोज पाटील सांगितलं.
'राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख'
राष्ट्रवादीत दोन गट झाल्यावर दोन्हीही गटांकडून वयक्तिक टीका टिपण्णी केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः शरद पवारांच्या विरोधात टीका करतात. सरोज पाटील यांनी या विषयी खंत व्यक्त केली आहे. “राजकीय पातळी सोडल्याचं दु:ख वाटतंय. पण आमच्या आईनं आम्हाला शिकवलंय की रडत बसायचं नाही. कसा तोल सुटतो हे मला कळत नाही. पण शरदच्या बाबतीत त्याच्या तोंडून जी काही भाषा आली, ते बोलता बोलता आलं असेल. कारण तो संवेदनशील आहे. आम्ही त्याला लहानपणापासून ओळखतो. त्याला कदाचित पश्चात्ताप झाला असेल. पण या सगळ्याचं दु:ख नक्कीच झालं”, असं त्या म्हणाल्या.
श्रीनिवास पवार यांचीही नाराजी
अजित पवार यांचे सख्खे मोठे भाऊ श्रीनिवास पवार यांनी नुकतीच अजित पवारांच्या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे. “तुम्हाला आश्चर्य वाटले की मी दादांच्या विरोधात कसा? मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी उडी मारली. दादांची आणि माझी चर्चा झाली तेव्हा मी त्याला सांगितलं की तू आमदारकीला आहे तर खासदारकी साहेबांना (शरद पवार) दिली पाहिजे. कारण त्यांचे आमच्यावर उपकार आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून आई वडिलांना कुणी घराबाहेर काढतं का? यांना जी काही पदं मिळाली ती शरद पवारांमुळेच. आता त्यांना म्हणायचं घरी बसा, किर्तन करा हे काही मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते, तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते. आपण वाईट वाटून घ्यायचं नाही. जे लाभार्थी आहेत त्यांच्या मागे जायचं नाही.” असं श्रीनिवास पवार म्हणाले होते.