साताऱ्याचा उमेदवार ठरला, शरद पवारांचा सच्चा सैनिक मैदानात, माढाबाबत सस्पेन्स

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाविकास आघाडीचं जागा वाटपावर एकमत झाले आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागा वाटप जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत सातारा आणि रावेरच्या उमेदवरांची घोषणा करण्यात आली आहे. याआधी राष्ट्रवादी शरद पवार गटानं सात उमेदवारांची घोषणा केली होती. त्यात आता आणखी दोन नावांची भर पडली आहे. मात्र माढा लोकसभेचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स मात्र कायम आहे. आतापर्यंत शरद पवार गटानं ९ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. त्यांच्या वाट्याला एकून १० जागा आल्या आहेत. 

साताऱ्यातून कोणाला उमेदवारी? 
साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता. त्यामुळे इथं शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असणार याबाबत उत्सुकता होती. जागा जरी राष्ट्रवादीला मिळाली असली तरी उमेदवार निश्चित होत नव्हता. या मतदार संघातून सारंग पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे आणि शशिकांत शिंदे हे इच्छुक होते. शिवाय पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशीही चर्चा होती. मात्र आता या सर्व चर्चांना शरद पवारांनी पुर्णविराम दिला आहे. त्यांनी साताऱ्यातून आपले विश्वासू शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

कोण आहेत शशिकांत शिंदे? 
शशिकांत शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. अजित पवारांनी बंड केल्यानंतर शिंदेंनी शरद पवारांची साथ दिली. शशिकांत शिंदे हे जावळी आणि कोरेगाव विधानसभा मतदार संघातून आमदारही राहीले आहेत. शिवाय पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रीमंडळात ते मंत्रीही राहीले आहेत. सातारा जिल्ह्यात त्यांची चांगली ताकद आहे. माथाडी कामगारांतही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे त्याचे बलस्थान आहे. साताऱ्यातून त्यांची लढत उदयनराजे भोसलेंबरोबर होण्याची दाट शक्यता आहे. 

साताऱ्याचं ठरलं माढ्याबाबत सस्पेन्स  
सातारा लोकसभा मतदार संघातून शशिकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा झाली असली तर माढ्याबाबत सस्पेन्स कायम आहे. माढ्याचा उमेदवार पवारांनी अजूनही जाहीर केलेला नाही. महायुतीने रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकरांनी विरोध दर्शवला आहे. अशा स्थितीत धैर्यशील मोहिते पाटील शरद पवारांच्या  गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच इथला उमेदवार निश्चित होईल. पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  

Advertisement

आतापर्यंत 9 उमेदवारांची घोषणा 
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं आता पर्यंत 9 उमेदवारांची घोषणा केली आहेत. त्यात बारामती सुप्रिया सुळे, शिरूर अमोल कोल्हे, अहमदनगर निलेश लंके, बीड बजरंग सोनावणे, वर्धा अमर काळे,  दिंडोरी भास्कर भगरे, भिवंडी सुरेश म्हात्रे, सातारा शशिकांत शिंदे आणि रावेर श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.