माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. साळुंखे यांनी शुक्रवारी (18 ऑक्टोबर 2024) उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. त्यांना ठाकरे गटानं सांगोल्याची उमेदवारी देखील जाहीर केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे पडसाद महाविकास आघाडीमध्ये उमटले आहेत. शेतकरी कामगार पक्षानं या आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला हा शेतकरी कामगार पक्षाचं केंद्र मानला जातो. दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांनी अनेकदा सांगोल्याचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. सांगोलासह रायगड आणि नांदेड जिल्ह्यातील कंधार जागा लढवण्याबाबत शेकाप आग्रही आहे.
शेतकरी कामगार पक्षाला या जागा मिळाल्या नाहीत, तर आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू. शेतकरी कामगार स्वतःच्या ताकदीची चुणूक महाराष्ट्राला दाखवून देईल, असा इशारा शेकापाचे नेते बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे.
बाबासाहेब देशमुख हे सांगोला विधानसभा निवडणुकीतील शेकापचे संभाव्य उमेदवार आहेत. मागील निवडणुकीत सांगोल्यातून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विजयी झाले होते. शहाजीबापू पाटील सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. आगामी निवडणुकीत शेकाप सांगोला विधानसभेत उमेदवार देईल आणि निवडणूक लढेल. सांगोला मतदारसंघाववर शेकापचा लाल बावटा फडकवणे हीच गणपत देशमुख यांना श्रद्धांजली असेल असंही बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर केलं.
( नक्की वाचा : महाविकास आघाडीत मोठा तणाव, 'पटोले असतील तर चर्चा नाही', ठाकरे गटानं ठणकावलं! )
'शेकापनं मन मोठं करावं'
दरम्यान शेतकरी कामगार पक्षानं मन मोठं करावं आणि मला सहकार्य करावं. मी इतकी वर्ष त्यांना सहकार्य केलं आहे. आमचा विजय निश्चित आहे, अशी भावना दीपक सांळुखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केली.