- परभणी महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे एका मताने विजयी झाले.
- प्रभाग क्रमांक 1 अ मध्ये शिवसेना ठाकरे गट, भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली
- मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रावर तणाव व धाकधुक निर्माण झाली होती
महापालिका निवडणुकीचा निकाल आता जाहीर झाला आहे. यात काही निकाल हे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणारे ठरले आहेत. तर काही निकाल हे राज्यात चर्चेचा विषय ही ठरले आहे. एक एक मत किती महत्वाचे असते हे दाखवणारी ही निवडणूक होती. त्याचा प्रत्येय परभणी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे. इथं शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार अवघ्या एका मताने जिंकला आहे. या मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. शिवाय धाकधुक ही वाढली होती. शेवटी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारी प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराला 1 मताने मात दिली.
परभणी महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 अ मधून शिवसेना ठाकरे गटाने व्यंकट डहाळे यांनी उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपचे प्रसाद केशवराव नागरे यांचे आव्हान होते. तर शिवसेना शिंदे गटाने ही मोहन सोनवणे यांनी मैदानात उतरवले होते. या प्रभागात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. मतमोजणी वेळी उमेदवारांची धाकधूक वाढली होती. मतदान केंद्रात टेन्शन निर्माण झाले होते. एक वेळ अशी आली की निकाल राखून ठेवण्यात आला. त्यामुळे तर तणाव निर्माण झाला होता. खासदार बंडू जाधव तिथे पोहोचले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धारेवर धरले. पोस्टल मतदानाची ही मतमोजणी करण्यात आली.
शेवटी तीन तासाच्या गोंधळानंतर निकाल जाहीर करण्यात आला. त्यात शिवसेना ठाकरे गटाचे व्यंकट डहाळे यांना 4312 मते मिळाली. तर भाजपच्या प्रसाद केशवराव नागरे यांना 4311 मते मिळाले. ठाकरे गटाचे व्यंकट डहाळे अवघ्या एका मताने विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यातला सर्वात शॉकींग निकाल मानला जातो. याच वार्डात शिवसेना शिंदे गटाच्या मोहन सोनवण यांनी 1365 मते मिळाली. तर 113 नोटाला मते मिळाले. एका मताने पराभव झाल्याने भाजप उमेदवाराच्या हा पराभव जिव्हारी लागला आहे.
परभणी महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक 25 जागा जिंकल्या आहेत. इथं काँग्रेसच्या मदतीने शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसला इथं 12 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला ही 12 जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 11 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला या महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे राज्यातल्या एकमेव महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचा महापौर होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world