Solapur Lok Sabha 2024 : प्रणिती शिंदे-राम सातपुते युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, जरांगे फॅक्टर ठरणार निर्णयक

राम सातपुते यांनी प्रचारात विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता. तर प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून केलेली टीका, सोलापुरातील अनेक रखडलेल्या विकास कामासंदर्भात कळीचा मुद्दा केला.

Advertisement
Read Time: 3 mins

सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन युवा आमदारांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. दोन्हीही नेते आक्रमक आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून आमदार राम सातपुते तर महाविकास आघाडीकडून आमदार प्रणिती शिंदे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं.

भाजपकडून माळशिरस मतदारसंघाचे आमदार राम सातपुते यांना ऐनवेळी दिलेली उमेदवारी चर्चेचा विषय ठरली. तर काँग्रेसकडून सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी दोन महिने आधीच प्रचारात आघाडी घेतली होती. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी ऐनवेळी घेतलेली माघार त्यानंतर वंचितने अपक्ष आतिश बनसोडे यांना दिलेला पाठिंबा काँग्रेसला बळ देणारा ठरला आहे. भाजपकडून राम सातपुते आणि काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांच्यात थेट लढाई दिसून येत आहे.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रचारात दिग्गज नेत्यांची फौज

भाजपच्या राम सातपुते यांची मदार मतदारसंघातील पाच आमदारांवर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा राम सातपुते यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतात. तर काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघ पिंजून काढत दणक्यात प्रचार केला. प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे स्वतः मैदानात उतरले होते. दोन्ही उमेदवारांमध्ये येथे अटीतटीचा सामना होईल, असं बोललं जातंय. 

प्रचारात गाजलेल मुद्दे

राम सातपुते यांनी प्रचारात विकासाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे कुटुंबाविषयी घराणेशाहीचा त्यांनी काढलेला विषय, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 40 वर्षात सोलापूरचा न केलेला विकास, सोलापुरातील धार्मिक विषयांवर केलेले विधान प्रचारात गाजले. 

तर प्रणिती शिंदे यांनी उपरा उमेदवार म्हणून केलेली टीका, सोलापुरातील अनेक रखडलेल्या विकास कामासंदर्भात कळीचा मुद्दा केला. सोलापुरातील उद्धव ठाकरे यांच्या सभेत शिंदे यांनी सोलापूरच्या एकात्मतेचा उपस्थित केलेला मुद्दा चर्चेत राहिला. 

Advertisement

(नक्की वाचा - Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरकरांचं यंदा काय ठरलंय? शाहू महाराज की संजय मंडलिक?)

मराठा आरक्षणाचा मुद्दा 

सोलापूर लोकसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची निर्णायक मते आहेत. तर मुस्लीम समुदायाने मोठ्या प्रमाणावर मतदान करून काँग्रेसला बळ देण्याचा प्रयत्न केला. सोलापूर, पंढरपूर, मोहोळ विधानसभा मतदारसंघात  जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाची भूमिका मतदारसंघात निर्णायक ठरते. लोकसभा मतदारसंघातील ओबीसी मतदारांनी मात्र भाजपला साथ दिल्याचे दिसून आले. मात्र या मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत राहिला.

सुशील कुमार शिंदे यांचा झालेला पराभव

माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा दारून पराभव झाला होता. 2019 साली प्रकाश आंबेडकर यांच्या मतांची टक्केवारी निर्णायक ठरल्यामुळे सुशील कुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. 2019 साली भाजपकडून लिंगायत मतांसाठी धर्मगुरू डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना मैदानात उतरवून लिंगायत समाजाची एक गठ्ठा मते भाजपला मिळाली होती. 2019 चा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सुशील कुमार शिंदे यांचा पराभव प्रणिती शिंदे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यामुळेच 2024 च्या निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे यांनी प्रचारात आघाडी घेऊन भाजपला घाम फोडला आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Sangli Lok Sabha 2024: जिंकणार तर 'पाटील'च! पण कोणते?; सांगलीकरांचा कौल कुणाला?)

मतदानाची आकडेवारी 

वाढलेला मतदानाचा टक्का ठरेल निर्णायक

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वाढलेली टक्केवारी निर्णायक ठरणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण 59 टक्के मतदान झाले आहे. 2019 साली मतदारसंघात 58.45 टक्के मतदानाची नोंद झाली होती.  यंदाच्या निवडणुकीत 59.19  टक्के मतदान झाले आहे. मोहोळ आणि दक्षिण सोलापुरातील मतदानाचा वाढलेला टक्का निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

  • मोहोळ - 63.15 टक्के
  • सोलापूर शहर उत्तर- 59.15 टक्के
  • सोलापूर शहर मध्य - 56.51 टक्के
  • अक्कलकोट- 59.17 टक्के
  • सोलापूर दक्षिण - 58.28 टक्के
  • पंढरपूर - 59.04 टक्के

(वाचा - Baramati Lok Sabha 2024: नणंद की भावजय? बारामतीचा गड कोणत्या पवारांकडे राहणार?)

मतदारसंघातील विधानसभानिहाय राजकीय समीकरण

सोलापूर लोकसभा मतदारसंघावर भाजपचे एकहाती वर्चस्व दिसून येते. भाजपचे चार तर सहयोगी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या रूपाने काँग्रेसचा एकच आमदार येथे आहे. 

Advertisement
  • मोहोळ विधानसभा - यशवंत माने (राष्ट्रवादी)
  • सोलापूर शहर उत्तर विधानसभा-  विजय देशमुख (भाजप)
  • सोलापूर शहर मध्य विधानसभा - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
  • अक्कलकोट विधानसभा- सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
  • सोलापूर दक्षिण विधानसभा - सुभाष देशमुख (भाजप)
  • पंढरपूर विधानसभा - समाधान औताडे (भाजप)