मुनगंटीवारांचं 'ते' वादग्रस्त वक्तव्य, वाद पेटला, फटका कोणाला?

जाहिरात
Read Time: 2 mins
चंद्रपूर:

लोकसभा निवडणुकीला आता रंग चढू लागला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. त्यात चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर तर वातावरण अधिक तापले आहे. ही सभा जरी मोदींची असली तर त्यात सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या भाषणामुळे वाद पेटला आहे. मुनगंटीवारांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे ते अडचणीत आले आहेत. काँग्रेसनं त्यांना या प्रकरणी चागलचं घेरलं आहे. मुनगंटीवार यांनीही काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. 

वाद का निर्माण झाला? 
पंतप्रधान मोदींची चंद्रपूरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत  सुधीर मुनगंटीवार यांनी इंदीरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीवर भाष्य केलं होतं. यावर बोलताना त्यांनी बहीण-भावाच्या नात्याला शरम वाटेल असं वक्तव्य केलं होतं. त्यांचं ते भाषण सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायर होत आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांना टिकेलाही सामोरे जावं लागत आहे. त्या दंगलीत काही वाईट गोष्टी झाल्या या सांगण्याच्या नादात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली आहे. 

Advertisement

काँग्रेसनं केली कारवाईची मागणी 
सुधीर मुनगंटीवार यांनी केलेले वक्तव्य हे आक्षेपार्ह आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं याची तात्काळ दखल घेतली पाहीजे. त्याच बरोबर त्यांच्यावर कारवाईही केली पाहीजे अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा तऱ्हेची विखारी भाषा खपवून घेतली जाऊ नये. "एका भावाला बहिणीबरोबर " सारखे भयंकर व बेफाम आरोप मुनगंटीवार यांनी केले. हरण्याच्या भीतीने तोल ढळला आहे. असं सावंत यांनी म्हटलं आहे.  नुकतेच "आप"च्या मंत्री आतिशी यांनी भाजपाने त्यांना पक्षात प्रवेश करावा अशी ऑफर दिली, असा आरोप केला, तेव्हा निवडणूक आयोगाने आतिशींना नोटीस पाठवली. जगनमोहन रेड्डी यांना तसेच सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठवली. त्यामुळे आता मुनगंटीवारांवरही त्याच पद्धतीनं कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. 

Advertisement
Advertisement

मुनगंटीवारांचा पलटवार 
सोशल मीडियावरून हल्ला होत असताना सोशल मीडियावरूनच मुनगंटीवार यांनी काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं आहे. १९८४ साली काँग्रेस ने केलेल्या अत्याचारांची आठवण करुन दिली तर इतक्या मिरच्या झोंबल्या. अर्धवट क्लिप वायरल करुन काँग्रेसने जनतेवर केलेले अन्याय तुम्ही लपवू शकणार नाही. १९८४ च्या दंगलीत असे अत्याचार झालेच नाहीत असं छाती ठोक पणे मला काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावं. काँग्रेसच्या हुकूमशाही राजवटीवर मी नेहमी बोलत राहीन आणि तुमच्या अशा खोडसाळपणामुळे मी बिलकुल घाबरणार नाही. वंदे मातरम!!! अशा पद्धतीची प्रतिक्रीया ट्वीटरवरून त्यांनी दिली आहे. 

चंद्रपूरात धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार सामना
चंद्रपूर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर विरुद्ध भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्यात थेट लढत होत आहे. आरोप - प्रत्यारोपामुळे इथलं राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मात्र या आरोपांचा आणि प्रत्यारोपांचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला फटका बसणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.