जाहिरात

Thackeray Brothers Interview: 'त्यांची अपेक्षाच नव्हती'; ठाकरेंनी सांगितलं युतीचं गुपित, शिंदेंबद्दल म्हणाले..

Thackeray Brothers Interview:  शिवसेना उबाठा आणि मनसेच्या या ऐतिहासिक युतीमुळे सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Thackeray Brothers Interview: 'त्यांची अपेक्षाच नव्हती'; ठाकरेंनी सांगितलं युतीचं गुपित, शिंदेंबद्दल म्हणाले..
Thackeray Brothers Interview: राज ठाकरेंनी या मुलाखतीमध्ये युतीचं गुपित सांगितलं.
मुंबई:

Thackeray Brothers Interview: येत्या 15 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील 29 महापालिकांसाठी होणारे मतदान राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण देशाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याने निवडणुकीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.

 शिवसेना उबाठा आणि मनसेच्या या ऐतिहासिक युतीमुळे सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत दोन्ही नेत्यांची एक विशेष मुलाखत पार पडली, ज्यामध्ये त्यांनी भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) घणाघाती टीका केली.

'आऊट ऑफ सिलॅबस' पेपर

राज ठाकरे यांनी या मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले. सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांसाठी सर्व योजना आखल्या होत्या, मात्र ठाकरे बंधूंची युती होईल याची त्यांनी कधी स्वप्नातही अपेक्षा केली नव्हती, असे राज ठाकरे म्हणाले. विरोधकांनी आखलेल्या रणनीतीमध्ये ही युती म्हणजे त्यांच्यासाठी आऊट ऑफ सिलॅबस पेपर आल्यासारखे असल्याचा दावा त्यांनी केला. 

गेल्या 7 वर्षांपासून निवडणुका तुंबल्या होत्या आणि जर वेळेत निवडणुका झाल्या असत्या, तर आज जे चित्र दिसते आहे ते कदाचित वेगळे असते, असेही त्यांनी सांगितले .

(नक्की वाचा : Thackeray Brothers Interview: 'महापौरांनाही सुरतेला उचलून नेतील"; व्हेनेझुएलाचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंचा दावा )

'मराठी माणसांत फूट पाडणे हेच मिंधेंना काम'

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका करताना त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सध्या केवळ नुरा कुस्ती सुरू असून, विरोधकांसाठी कोणतीही जागा ठेवायची नाही असा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठी माणसाची मते फोडण्यासाठीच मिंधेंना वापरले जात असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठी माणसात फूट पाडणे हेच काम सध्या एकनाथ शिंदे यांना देण्यात आले असून, त्यांना केवळ त्या कामासाठीच समोर केले जात असल्याची बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले. सोयीच्या हिंदुत्वाला कोणताही अर्थ नसतो, असे सांगत त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या कार्याची आठवण करून दिली. हिंदुस्थानात केवळ हिंदुत्वाच्या जोरावर निवडणूक लढवून ती जिंकता येते, हे सिद्ध करणारे एकमेव नेते बाळासाहेब ठाकरे होते. 

ज्या काळात बाळासाहेबांनी हे करून दाखवले, त्या काळात भाजप गांधीवादी समाजवादात अडकला होता, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. सध्या केवळ निवडणुका जिंकण्यासाठी हिंदुत्वाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

(नक्की वाचा : KDMC Election भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेचा ट्रिपल धमाका! डोंबिवलीत एकाच घरातील 3 जणांना उमेदवारी, कारण काय? )

'... हे देशाला दाखवणार'

मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, ठाकरे बंधू एकत्र येण्याचे मुख्य कारण मराठी माणसाचे न्याय आणि हक्क हेच आहे. आम्ही एकत्र आलो म्हणजे इतर भाषिकांवर अन्याय करण्यासाठी आलो आहोत, असा त्याचा अर्थ होत नाही. मात्र, महाराष्ट्र कोणासमोरही लाचार होत नाही, हे संपूर्ण देशाला दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. राज्याच्या अस्मितेशी खेळणाऱ्यांना या निवडणुकीत धडा शिकवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबईवर कब्जा करण्यापेक्षा गुजरातचा विकास करा

राज ठाकरे यांनी राज्याच्या ढासळत्या राजकीय परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या दळिद्री राजकारणाला बाजूला सारून महाराष्ट्राने पुन्हा एकदा नवी झेप घेण्याची गरज आहे. जर हे थांबले नाही, तर देशाला दिशा दाखवणारा आपला महाराष्ट्र युपी आणि बिहारपेक्षाही मागे जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. 

मुंबईवर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी अहमदाबाद, बडोदा आणि सुरतचा विकास करून त्यांची मुंबई करावी, आम्हाला त्यात आनंदच होईल. स्वतःच्या राज्यात विकास करण्याऐवजी मुंबईवर डोळा ठेवणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना सलीम खान यांच्या एका वाक्याचा संदर्भ दिला. ज्याप्रमाणे प्रत्येक वस्तूच्या पाकिटावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तशीच या सरकारचीही एक्सपायरी डेट नक्कीच जवळ आली आहे, असे त्यांनी सुचवले. 

सध्या निवडणुका जिंकण्यासाठी वेड्यासारखे पैसे वाटले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात सावध पावले टाकत मुंबई आणि ठाणे यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आपली ताकद दाखवून देणार असल्याचे संकेत ठाकरे बंधूंनी या मुलाखीतून दिले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com