Kalyan Dombivli Municipal Election 2026: कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या रणांगणात सध्या एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांची चर्चा रंगली आहे. राजकारणात घराणेशाही काही नवीन नाही, पण एकाच प्रभागातून एकाच कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी मिळणं हा एक वेगळाच विक्रम मानला जात आहे. भाजपमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर धात्रक कुटुंबाने थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आणि शेवटच्या क्षणी आपले अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांच्या वॉर्डातील लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
भाजपाच्या बालेकिल्ल्यात मनसेची मोठी खेळी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 25 मध्ये मनसेने ही मोठी खेळी खेळली आहे. शैलेश धात्रक, मनिषा धात्रक आणि त्यांची मुलगी पूजा धात्रक या तिघांनीही मनसेतर्फे आपले उमेदवारी अर्ज भरले आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते.
मात्र तिकीट वाटपावरून झालेल्या नाराजीनंतर त्यांनी मनसेची साथ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या प्रभागातील निवडणूक आता प्रचंड चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
( नक्की वाचा : KDMC Election : कल्याण डोंबिवलीतील 'या' प्रभागात बिग फाईट, आमदार ते माजी महापौरांपर्यंत सर्वांची प्रतिष्ठा पणाला )
रात्रभर वाट पाहिली पण एबी फॉर्म मिळाला नाही
धात्रक कुटुंबाचा भाजप सोडण्याचा प्रवास अत्यंत नाट्यमय राहिला. शैलेश आणि मनिषा धात्रक हे दोघेही भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. उमेदवारी मिळेल या आशेने त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानाबाहेर पहाटे 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म मिळवण्यासाठी प्रतीक्षा केली. मात्र, शेवटपर्यंत त्यांच्या पदरी निराशाच पडली. आपला पत्ता कट झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तिथून काढता पाय घेतला आणि थेट राज ठाकरे यांच्या मनसेचा रस्ता धरला.
धात्रक कुटुंबाचा राजकीय प्रवास आणि इतिहास
धात्रक कुटुंबाचा हा राजकीय प्रवास चढ-उतारांचा राहिला आहे. 2010 च्या महापालिका निवडणुकीत मनसेने मनिषा धात्रक यांना उमेदवारी देऊ केली होती, पण त्यावेळी त्यांनी भाजपला पसंती दिली आणि त्या निवडूनही आल्या.
( नक्की वाचा : KDMC Election 2026 : केडीएमसीमध्ये लक्ष्मीपुत्रांचा बोलबाला; कोण आहे सर्वात श्रीमंत उमेदवार? वाचा टॉप 10 यादी )
त्यानंतर 2015 च्या निवडणुकीत भाजपने मनिषा यांच्यासह त्यांचे पती शैलेश धात्रक यांनाही उमेदवारी दिली होती. त्यावेळी हे दोन्ही पती-पत्नी विजयी झाले होते. यंदाही त्यांनी दोघांसाठी उमेदवारी मागितली होती, पण पक्षाने कोणा एकालाच संधी देण्याचे संकेत दिले होते. अखेर कोणालाच संधी न मिळाल्याने त्यांनी मुलीसह मनसेत प्रवेश केला.
प्रभागातील समीकरणं बदलली
पॅनल क्रमांक 25 मध्ये आता राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. भाजपाने या ठिकाणाहून काँग्रेसमधून आलेल्या नंदू म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भाजपचे पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांनाही रिंगणात उतरवले आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्यांना संधी दिल्याचा आरोप आता धात्रक समर्थकांकडून केला जात आहे. एकाच घरातून तीन उमेदवार रिंगणात उतरल्याने मतदारांचा कल कोणाकडे झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world