विधानसभा निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाचा मोठा पराभव झाला. त्यांच्या पदरात केवळ 20 जागा पडल्या. त्यानंतर हे सर्व अनाकलनीय आणि अनपेक्षित असल्याची प्रतिक्रीया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यानंतर नवनिर्वाचित आमदारांची आणि पराभूत उमेदवारांबरोबर ठाकरे यांनी चर्चा केली. पराभवाची कारणे जाणून घेतली. त्यानंतर ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्या संदर्भात आजच्या बैठकीत सुतोवाच केलं आहे. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ईव्हीएमबाबत रण उठवण्याची तयारी ठाकरेंनी केली आहे. तर शरद पवारांचा गटही ईव्हीएमबाबत आक्रमक झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाविकास आघाडीचा झालेला पराभव अजूनही आघाडीच्या नेत्यांच्या पचनी पडत नाही. त्यातून पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएममुळेच गोंधळ झाला आहे. त्यावेळी काय काय घडलं याचा पाढाही अनेकांनी वाचला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळा विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. जिथे जिथे ईव्हीएम आणि मतमोजणीमध्ये गोंधळ झाला आहे, त्या ठिकाणी सर्व पराभूत उमेदवारांना व्हीव्हीपॅट मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाला अर्ज करण्याच्या सूचना केल्या आहेत. किमान पाच टक्के तरी व्हीव्हीपॅट मतांची तपासणी करावी, असं उमेदवारांना सांगण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही आता ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमीका घेण्याचे ठरवले आहे. आता कोणत्या ही स्थितीत मागे हटायचे नाही असं पक्षाने ठरवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत उमेदवारांनी केलेल्या तक्रारी संदर्भात एक वकिलांची टीम करण्याचा शरद पवारांनी निर्णय घेतला आहे. राज्यपातळीवर एक आणि केंद्रीय पातळीवर कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम तयार केल्याचेही समोर आले आहे.
केवळ आरोप करण्यापेक्षा ईव्हीएम बाबत जे आक्षेप आहेत किंवा निवडणूक प्रक्रियेत ज्या चुकीच्या बाबी घडल्या ते सर्व पुरावे गोळा करण्याच्या उमेदवारांना सूचना शरद पवारांनी केल्या आहेत. 28 तारखेपर्यंत व्हीव्हीपॅट तपासणीसाठी वेळ असल्याने उमेदवारांनी तत्काळ व्हीव्हीपॅट तपासणी करावी अशी सूचना ही त्यांनी केल्याचे समजते. राज्य पातळीवर ज्या प्रकारे लढाईला सुरूवात करण्यात आली, त्याच प्रमाणे इंडिया आघाडी देखील लढाई लढणार असल्याची शरद पवारांची उमेदवारांना सांगितले. आता मागे हटायच नाही लढायचं, असं शरद पवारांनी पराभूत उमेदवाराना सांगितलं.