महायुतीला विधानसभा निवडणुकीत जबरदस्त विजय मिळाला. त्यानंतर त्यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. पण महायुतीचा मुख्यमंत्री कोण? यावर सर्व घोडं अडले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. अशात अजित पवारांनी मात्र फडणवीसांना पाठिंबा जाहीर केला आहे. अशा वेळी काही आमदारांनी मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे. त्यात उत्तर महाराष्ट्रातले आमदार आघाडीवर आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक दोन नाही तर 18 आमदारांनी आपल्याला मंत्रीपद मिळावं यासाठी आतापासून तयारी केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर महाराष्ट्रात महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. 47 पैकी 43 मतदार संघात महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. त्यात सर्वाधिक आमदार हे भाजपचे आहे. भाजपचे 20 आमदार निवडून आले आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 12 आमदार उत्तर महाराष्ट्रातून विजयी झाले आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 11 जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या विजयात उत्तर महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. अशा वेळी मंत्रीपदाची आस इथल्या आमदारांना लागली आहे.
नाशिक जिल्ह्यातून 8 आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. त्यात दादा भुसे आणि छगन भुजबळ हे विद्यमान सरकारमध्ये मंत्री होते. तर नरहरी झिरवाळ हे विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत.या तिघांनी पुन्हा मंत्री व्हायचे आहे.तर भाजपकडून राहुल आहेर, सीमा हिरे,देवयानी फरांदे हे मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. तर अजित पवाराच्या राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटे मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. तस शिंदे सेनेच्या सुहास कांदे यांनी मंत्रीपद मिळावे असं सांगितलं आहे.
नाशिक जिल्ह्या प्रमाणे जळगावनेही महायुतीला आधार दिला आहे. गुलाबराव पाटील,गिरीश महाजन हे विद्यमान मंत्री पुन्हा निवडून आले आहेत. त्यांच्या बरोबर सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे यांनीही मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न ही सुरू आहेत. पण त्यातील किती जणांना संधी मिळणार हे त्यांचे पक्ष नेतृत्व ठरवणार आहे. धुळे जिल्ह्यातून जयकुमार रावल यांनी पुन्हा मंत्रिमंडळात वर्णी लागावी यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. तर नंदूरबारमधून विजयकुमार गावित हे विद्यमान मंत्री आहेत. त्यांनाही मंत्री व्हायचे आहे.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री कोण होणार? अजित पवारांच्या खेळीने शिंदे बॅकफूटवर
अहील्यानगर जिल्ह्यानेही महायुतीच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आहे. त्यामुळे विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा मंत्री होण्याच्या तयारीत आहेत. तर अजित पवार गटाचे संग्राम जगताप आणि आशुतोष काळे यांनाही मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. इतक्या सर्वांनी मंत्रिपदावर दावा केल्यामुळे पक्षाच्या प्रमुखां समोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातील किती जणांना संधी द्यायची या कात्रीत ते सापडले आहेत. कोणाला नाराज करायचं आणि कोणाची समजूत काढायची असा प्रश्न आता त्यांच्या समोर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world