महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची प्रचारसभा मुंबईत बुधवारी (6 नोव्हेंबर) झाली. या प्रचारसभेच्या पूर्वी उद्धव ठाकरे पोलिसांवर चांगलेच संतापले होते. त्यांच्या सुरक्षारक्षकांना पोलिसांनी सभास्थळी अडवल्यानं ठाकरे संतापले होते. कोण आहे तो त्याचं नाव लिहून घ्या असं ठाकरे यांनी पोलिसांना विचारलं. त्यांचा संताप पाहून एका पोलीस अधिकाऱ्याला मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर ठाकरे तिथून निघून गेले.
मुंबईतील बीकेसीमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या या सभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, शरद पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. ठाकरे यांचं सभास्थळी उशीरा आगमन झालं. त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी त्यांच्या सुरक्षारक्षकांना अडवलं. त्यांना आत सोडण्यास नकार दिला. ते लक्षात येताच उद्धव ठाकरे पोलिसांवर संतापले. सुरक्षारक्षकांना पहिल्यांदा आत घ्या, असं त्यांनी सांगितलं.
ठाकरे यांनी पोलिसांना उद्देशून तो कोण आहे? त्याचं नाव घेऊन ठेवा, असं सुनावलं. त्यामुळे सभेच्या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.
फडणवीसांना सल्ला
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलेल्या भाषणात महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंब्र्यात जाण्याचा सल्ला दिला. यावेळी ठाकरे म्हणाले की, 'देवाभाऊ, मुंब्र्यामध्ये पहिल्यांदा जा, मुंब्र्याच्या प्रवेशद्वारावर जे शिल्प आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराज आहेत. जिजाऊ आहेत. तुकाराम महाराज आहे. सावित्रीबाई फुले आहेत. हे पाहा.
पण, मुंब्रा ठाणे जिल्ह्यात येतो. ज्या जिल्ह्यातून तुम्ही आमचा गद्दार फोडला आणि डोक्यावरती बसवला होता त्याच्या जिल्ह्यात तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणं अवघड वाटत असेल, तर गद्दाराला घेऊन नाचलात कशाला?' असा सवाल ठाकरे यांनी विचारला.