राज्यात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, पालघर आणि धुळ्यातील मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. एकीकडे मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी अचानक पत्रकार परिषद घेत मतदार केंद्रांवर मतदानासाठी होत असलेल्या दिरंगाईबाबत प्रशासनावर निशाणा साधला आहे. निवडणुकीत मतदान कसं कमी होईल, यासाठी प्रयत्न सुरु आहे का? असा संशय आहे. निवडणूक आयोग भाजपची चाकरी करतोय का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अनेक मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रांवर पोहोचले होते. मात्र मतदान केंद्रांवर त्यांना बराच वेळ थांबावं लागत आहे. जाणूनबुजून तिथे दिरंगाई केली जात आहे, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिक कंटाळून माघारी फिरत आहेत. निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझं नागरिकांना आवाहन आहे, त्यांनी पुन्हा मतदार केंद्रांवर जा. मतदान करा मगच बाहेर पडा. पहाटेचे 5 वाजले तरी बाहेर पडू नका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- कल्याण लोकसभा मतदारसंघातील 50 हजार नावं गायब? डोंबिवलीकर मागणार उच्च न्यायालयात दाद)
निवडणूक आयोगाचा घरगड्यासारखा वापर- उद्धव ठाकरे
भाजप पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर घरगड्यासारखा करत आहे. मतदान करतेवेळी दिरंगाई केली जात आहे. थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नका. मतदान केंद्रात जाऊन उभे राहा. मतदान केंद्रात जे निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी आहेत, त्यांना कितीही वाजले तरी सोडू नका. मतदान केल्याशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
(नक्की वाचा - 50 हजार खर्च, 1900 किमीचा प्रवास; दुबईहून आलेल्या मतदाराच्या पदरी पडली निराशा)
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली.
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) May 20, 2024
आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची…
पराभव समोर स्पष्ट दिसत असल्याने आरोप- देवेेद्र फडणवीस
उद्धव ठाकरे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत उत्तर दिलं आहे. मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे.
4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world