उत्तर प्रदेशात नवा ट्विस्ट, INDIA आघाडीच्या 6 खासदारांवर संकट

उत्तर प्रदेशातील निकालानंतर INDIA आघाडीमध्ये आनंदाचं वाातावरण आहे. पण, या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024 Result) उत्तर प्रदेशातील निकाल अनेकांसाठी धक्कादायक ठरले.  देशातील सर्वात मोठ्या राज्यात INDIA आघाडीनं 80 पैकी 43 जागा जिंकल्या. तर NDA ला 36 जागा मिळाल्या. INDIA आघाडीमध्ये निवडणूक निकालांनंतर आनंदाचं वाातावरण आहे. पण, या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. या आघाडीच्या तब्बल 6 जणांची खासदारकी संकटात आहे.

इंडिया आघाडीचे नवनिर्वाचित किमान 6 नवनिर्वाचित खासदारांवर गुन्हेगारी प्रकरणात खटले सुरु आहेत. या प्रकरणात त्यांना दोन पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा होऊ शकते. ही शिक्षा झाली तर त्यांचं संसद सदस्यत्व रद्द होईल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणत्या खासदारांना धोका?

गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले समाजवादी पार्टीचे उमेदवार अफझल अन्सारींना एका प्रकरणात यापूर्वीच चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या शिक्षेला अलाहाबाद उच्च न्यायालयानं मागच्या महिन्यात स्थगिती दिली होती. त्यामुळे अन्सारी यांना निवडणूक लढवता आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. उच्च न्यायालयानं अन्सारी यांची शिक्षा कायम ठेवली तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकते. 

आझमगड मतदारसंघातील विजयी उमेदवार धर्मेंद्र यादव यांच्यावर चार प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे. यामधील कोणत्याही खटल्यात त्यांना दोन पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्यांचंही सदस्यत्व रद्द होऊ शकतं. 

Advertisement

( नक्की वाचा : सर्वाधिक जागा देणाऱ्या 2 मोठ्या राज्यात भाजपाला फटका का बसला? )
 

बाबू सिंह कुशवाह  10 वर्षांचा वनवास संपवत जौनपूर मतदारसंघातून  विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात मायावती सरकारच्या कार्यकाळात झालेल्या NRHM घोटाळ्यासह अनेक खटल्यांची सुनावणी सुरु आहे. कुशवाह यांच्या विरोधात एकूण 25 केस दाखल करण्यात आल्या असून त्यापैकी 8 प्रकरणात आरोपपत्र निश्चित करण्यात आले आहेत. 

सूलतानपूर मतदारसंघातून भाजपा नेत्या मनेका गांधी यांचा पराभव करत समाजवादी पक्षाचे रामभूआल निषाद विजयी झाले. त्यांच्या विरोधात एका गँगस्टर अ‍ॅक्टमधील प्रकरणासह आठ प्रकरणात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. निषाद यांची खासदारकीही सध्या धोक्यात आहे. 

Advertisement

चांदौली मतदारसंघातून माजी मंत्री महेंद्रनाथ पांडे यांचा पराभव करत समाजवादी पक्षाचे विरेंद्र सिंह विजयी झाले. त्यांच्या विरोधात देखील गुन्हेगारी केस प्रलंबित आहेत. या प्रकरणात ते दोषी आढळले तर त्यांचा विजयाचा आनंद अल्पकाळ ठरु शकतो. 

( नक्की वाचा : राहुल गांधींनी एक चूक केली नसती तर आज देशाचं चित्र वेगळं असतं )
 

सहारनपूरमधील काँग्रेसचे विजयी उमेदवार इम्रान मसूद यांच्या विरोधात 8 केसेस दाखल आहेत. यामध्ये एक मनी लॉन्ड्रींगची देखील केस असून ED कडून त्याचा तपास सुरु आहे. मसूद यांच्या विरोधात आत्तापर्यंत दोन प्रकरणात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. 

Advertisement

आझाद समाजपार्टीचे विजयी उमेदवार चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात 30 पेक्षा जास्त प्रकरणं प्रलंबित आहेत. यापैकी एकाही प्रकरणात त्यांना दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याचा आझाद यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

यापूर्वी अनेक राजकीय नेत्यांचं सदस्यत्व त्यांना गुन्हेगारी प्रकरणात शिक्षा झाल्यानं रद्द झालं आहे. यामध्ये समाजवादी पार्टीचे नेते मोहम्मद आझम खान, त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांच्यासह भाजपाच्या खाबू तिवारी, विक्रम सैनी, राम दुलार गोंड, कुलदीप सेंगर आणि अशोक चंदेल यांचा समावेश आहे.