आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पैशांचा पुर आणणार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. याची चुणूक नुकतीच दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात जे पैसे पकडले हा त्याचाच एक भाग होता. त्या गाडीतून पाच कोटी रूपये जप्त करण्यात आले. ते महायुतीच्या उमेदवारासाठी चालले होते असा आरोपही त्यांनी केला. पाच कोटी जरी पकडले असले तरी त्या गाडीत पंधरा कोटी होते अशी माहिती असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती किती कोटींचा खर्च करणार आहे याचा आकडाच रोहीत पवार यांनी सांगितला. ते पंढपूरात आले होते त्यावेळी बोलत होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज्यात येत्या निवडणुकीत महायुती 4 हजार 800 कोटी रुपयांचा चुराडा करेल. त्यासाठी भ्रष्टाचारातून कमावलेले पैसे लावले जाणार असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीने प्रत्येक मतदार संघात 100 ते 150 कोटी खर्च केले होते असा आरोपही पवार यांनी केला आहे. समृद्धी महामार्गातूनही या महायुती सरकारने पैसा कमावला आहे. यातून त्यांनी गुजरातची निवडणूक लढवली. शिवाय आता अडीच वर्षात जवळपास 60 ते 70 हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. त्यातून मिळालेला पैसा महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीत वापरला जाईल असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - चला उमेदवारी अर्ज भरायला! 'हे' दिग्गज भरणार आज उमेदवारी अर्ज
जरी महायुतीने पैशाचा पुर या निवडणुकीत आणला तरी त्याचा काही एक फायदा होणार नाही. जनतेने हे सरकार बदलायचे आहे हा निश्चय केला आहे. त्यामुळे महायुतीने काही केले तरी त्याचा काही एक परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीच्या बाजूने जनमत आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत 180 जागांवर महाविकास आघाडी मुसंडी मारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री कोण याची चर्चा केली जाईल. आता जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यावर आघाडीचा भर असल्याचेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री शिंदेंची मध्यस्थी, अंबरनाथमधला पेच सुटला? किणीकर -वाळेकर वाद मिटला
दरम्यान सध्याच्या स्थितीत महायुतीत भाजपची ताकद ही कमी झाली आहे. त्या तुलनेत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच विरोधी पक्षनेते होतील असे पवार म्हणाले. महायुतीचे शंभरच्या आसपास आमदार निवडून येतील असे ही त्यांनी सांगितले. पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्यावर आमदार रोहित पवार यांनी एनडीटीव्ही बरोबर बातचीत केली. सांगोल्याबाबतही त्यांनी देशमुख्य कुटुंबाचा विचार केला जावा असे सांगितले. देखमुख कुटुंबा बरोबर पवार कुटुंब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.