Vinod Tawde on Rahul Gandhi : भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर विधानसभा निवडणुकीपूर्वी पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विरारमधील हॉटेलमध्ये तावडे यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांमध्ये तसंच निवडणूक आयोगाकडंही तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही तास शिल्लक आहेत. त्यावेळी भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यावर हा आरोप झाल्यानं विरोधकांना आयती संधी मिळाली. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी विनोद तावडेंवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ही संधी सोडली नाही. राहुल गांधी यांच्या आरोपाला विनोद तावडे यांनी उत्तर दिलंय.
काय म्हणाले तावडे?
राहुल गांधी यांनी या प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या हँडलनं केलेलं ट्विट रिट्विट केलं. त्यावर त्यांनी पंतप्रधान मोदींनाच प्रश्न विचारला. मोदीजी, हे 5 कोटी कुणाच्या तिजोरीतून (SAFE) बाहेर आले. लोकांचा पैसा लुटून तुम्हाला कुणी टेम्पो पाठवला? असा प्रश्न गांधी यांनी विचारला.
विनोद तावडे यांनी ट्विटला उत्तर दिलंय. 'राहुल गांधीजी तुम्ही स्वत: नालासोपाऱ्याला या. हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज पाहा. तिथं निवडणूक आयोगानं केलेली कारवाई पाहा आणि सिद्ध करा हा पैसा कुठून आला. कोणतीही माहिती न घेता या पद्धतीचं वक्तव्य बालीशपणा नाही तर काय आहे? ' असं उत्तर तावडे यांनी दिलं.
महायुतीला मिळणाऱ्या मोठ्या पाठिंब्यामुळे विरोधी पक्ष हताश झाले आहेत. त्यामुळेच ते निराधार आरोप करत हा विषय तापवण्याचा प्रयत्न करत आहे. निवडणूक आयोगानं या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, असा माझाही आग्रह आहे, असं तावडे यांनी स्पष्ट केलं आहे.