Vinod Tawde vs Kshitij Thakur : विधानसभा निवडणूक सुरु होण्यास काही तास बाकी आहेत. त्याचवेळी विरारमधील हॉटेल विवांतामध्ये घडलेल्या प्रकरणानं राज्यातील राजकारण तापलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीनं केला आहे. पालघर जिल्हा आणि विशेषत: नालासोपारा-वसई-विरार हा परिसर बहुजन विकास आघाडीचा (बविआचा) बालेकिल्ला मानला जातो. सध्याच्या विधानसभेत बविआचे तीन्ही आमदार यात भागातील आहेत.
विरारमध्ये विनोद तावडे यांना बविआच्या कार्यकर्त्यांनी घेरलं होतं. त्यावेळी दोन्ही गटामध्ये जोरदार वादावादी झाली. विनोद तावडे आणि बविआचे आमदार क्षितिज ठाकूर देखील यावेळी आमने-सामने आले होते. त्यांच्यातही या प्रकरणात वाद झाला. भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीसांना भिडणाऱ्या क्षितीज ठाकूर यांचा यापूर्वीचा इतिहासही दांडगाईचा आहे. त्यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता. तसंच त्यांनी यापूर्वी विधीमंडळही हादरवलं होतं.
( नक्की वाचा : पैसे वाटपाचा आरोप, विनोद तावडेंना घेरलं; विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा फुल राडा )
कोण आहेत क्षितिज ठाकूर?
क्षितीज ठाकूर हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचे पूत्र आहेत. सध्या 41 वर्षांचे असलेले क्षितिज 2009 साली नालासोपारा मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतर सलग तीन निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलाय. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत क्षितिज यांनी माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांचा पराभव केला होता.
12 वर्षांपूर्वी झाला होता राडा
क्षितिज यांची राजकीय कारकिर्द 2009 साली सुरु झाली. पण, त्यांचं नाव राज्यात 2013 साली झालेल्या एका प्रकरणामुळे गाजलं होतं. 2013 साली मुंबईतील वांद्रे वरळी-सी लिंकवरील टोल नाक्याजवळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी ठाकूर यांची कार अडवली होती. त्यावेळी क्षितिज ठाकूर आणि सूर्यवंशी यांच्यात वाद झाला.
हा वाद तेवढ्यावरच थांबला नाही. या घटनेनंतर काही दिवसांनी विधीमंडळ अधिवेश सुरु असताना सूर्यवंशी विधीमंडळ परिसरात आले होते. त्यावेळी क्षितिज ठाकूर यांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप झाला. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार असलेले राम कदम, शिवसेना आमदार राजन नाईक, भाजपा आमदार जयकुमार रावल, अपक्ष आमदार प्रदीप जैस्वाल यांच्यावरही या मारहाणीत सहभागी झाल्याचा आरोप होता. विधीमंडळ परिसरात आमदारांनी पोलिसांना मारहाण केल्याची धक्कादायक आरोप झाल्यानं संपूर्ण विधीमंडळ हादरलं होतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world