दिल्ली: राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाची सर्वांनाच उत्सुकता लागली असतानाच राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दोन दिवसांपूर्वी विरार पूर्वेला असणाऱ्या विवांता हॉटेलमध्ये जोरदार राडा झाला. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांना घेरले होते. या तब्बल सहा तासानंतर विनोद तावडे यांची हॉटेलमधून सुटका झाली.
नक्की वाचा: महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांसह काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनीही विनोद तावडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. विनोद तावडे यांनी ५ कोटी रुपये वाटण्यासाठी आणले होते, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, यांनी केले होते. पंतप्रधान मोदी धनशक्ती आणि दडपशाहीने महाराष्ट्रात सत्ता आणण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मल्लिकार्जुन
खरगे यांनी केला होता. तसेच मोदीजी हे 5 कोटी कोणाचे होते? असा सवाल राहुल गांधी यांनी केला होता.
याचप्रकरणी आता विनोद तावडे यांनी काँग्रेस नेत्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि प्रवक्त्या सुप्रिया श्रीनैत यांनी माझी आणि माझ्या पक्षाची बदनामी केली. माझ्यावर खोटे आरोप केले. माझ्यासारख्या सामान्य परिवारातून आलेल्या नेत्याच्या बदनामीचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक माझी बदनामी केल्यामुळे मी कायदेशीर नोटीस पाठवत आहे. त्यांनी सार्वजनिक रित्या माफी मागावी किंवा कारवाईला सामोरे जावे असा इशारा त्यांनी दिला आहे.
महत्वाची बातमी: निकालाआधी भाजपला दे धक्का! उद्धव ठाकरेंची माहिमधील खेळी उघड; बडा नेता फोडला