मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागायला अवघे काही तास शिल्लक आहेत. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्ष लागलेल्या माहिम विधानसभा मतदार संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला होता. माहिममध्ये शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असे तीन पक्ष मैदानात उतरले होते. मनसेकडून खुद्द राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सर्वांचे या लढतीकडे लक्ष लागले होते. दुसरीकडे शिंदे गटाकडून याठिकाणी सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला होता. सरवणकर यांचा अर्ज माघार घेण्यावरुन बरेच राजकारणही तापले होते.
नक्की वाचा: महायुती की महाविकास आघाडी? निकालाच्या एकदिवस आधी प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका
अशातच निकालाच्या एक दिवस आधी माहिम विधानसभा मतदार संघामध्ये ठाकरेंनी मोठी खेळी केली आहे. भाजपचे माहिम विधानसभेचे उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आज मातोश्रीवर दाखल होत ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. सचिन शिंदे यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थक, कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. निकालाच्या एक दिवस आधीच भाजपला मोठे खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे माहिमध्ये भारतीय जनता पक्ष माझ्यासोबत असल्याचा दावा सदा सरवणकर यांनी केला होता. आता निकालाआधी भाजपच्या विधानसभ प्रमुखांनीच ठाकरेंचे शिवबंधन बांधल्याने निवडणुकीत सदा सरवणकर यांना जोर का झटक बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्याच्या निकालामध्ये माहिम विधानसभेत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
'मी गेली 20 वर्ष भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. पक्षवाढीसाठी काम केले. माझ्यावर अन्याय झाला नाही म्हणणार नाही पण न्यायही मिळाला नाही. मी उद्धव ठाकरेंना भेटलो माझ्या कामात सहकार्य करणार आहेत. असं सचिन शिंदे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंनीही यावेळी त्यांचे स्वागत करत उद्याच्या निकालाची सर्वांना उत्सुकता आहे,' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाची बातमी: छत्तीसगडमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, 10 नक्षलवादी ठार; मोठा शस्त्रसाठा जप्त
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world