जाहिरात
This Article is From Apr 27, 2024

उमेदवारांची श्रीमंती! जळगाव - रावेर मतदारसंघात कोण सर्वात श्रीमंत?

उमेदवारांची श्रीमंती! जळगाव - रावेर मतदारसंघात कोण सर्वात श्रीमंत?
जळगाव:

लोकसभा निवडणुकीत उमेदवार आपले प्रतित्रापत्र उमेदवारी अर्जा बरोबर सादर करत आहेत. त्यातून त्यांच्या संपत्तीचा उलगडाही होत आहे. काहींच्या संपत्तीचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत तर काही उमेदवार किती गरीब आहेत हेही समोर आले आहे. आता जळगाव आणि रावेरच्या उमेदवारांची संपत्ती किती आहे हेही त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले आहे. या दोनही मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार संपत्तीच्या बाबतीत महायुतीच्या उमेदवारां पेक्षा सरस ठरले आहेत.    
 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा  

कोणाची संपत्ती सर्वाधिक?  

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील सर्वाधिक संपत्तीचे धनी ठरले आहेत.तर जळगाव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या संपत्तीचे आकडेही मोठे आहेत. त्या तुलनेत रावेरच्या भाजप उमेदवार रक्षा खडसे आणि जळगावच्या उमेदवार स्मिता वाघ काहीश्या मागे आहेत.  

हेही वाचा - गुजरातच्या कांद्याला निर्यातीची परवानगी, महाराष्ट्रासाठी मात्र नकार

श्रीराम पाटील यांची संपत्ती किती? 

श्रीराम पाटील हे रावेरचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आहेत. पाटील यांच्याकडे जवळपास 36 कोटींची संपत्ती आहे. त्यात स्थावर संपत्ती 15 कोटी, 56 लाख 12 हजार रुपये, जंगम मालमत्ता 21कोटी, 41लाख 48 हजार 259 रुपये इतकी आहे. तर पत्नी आशाबाई पाटील यांच्या नावे स्थावर संपत्ती 11 कोटी 26 लाख 32 हजार रुपये आहे. तर जंगम मालमत्ता 5 कोटी 54 हजार 782 रुपयांच्या घरात आहे. पाटील यांच्यावर जवळपास 1 कोटी 95 लाख 83 हजार 964 रुपयांचे कर्ज आहे. त्याच बरोबर पत्नी आशाबाई यांच्या नावे 3 कोटी 78 लाख 42 हजार 326 रुपयांचे कर्ज आहे. श्रीराम पाटील यांच्या नावावर 3 तर आशाबाई पाटील यांच्या नावावर 4 अशी एकूण 7 वाहने आहेत.  

रक्षा खडसेही कोट्यधीश 

रक्षा खडसे यांना भाजपने रावेर लोकसभेतून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटींच्या घरात आहे. त्यात स्थावर मालमत्ता 3 कोटी 74 लाख 53 हजारांची आहे. तर जंगम मालमत्ता 10 लाख 70 हजार किमतीची आहे. रक्षा खडसे यांच्या मुलांच्या नावे 2 कोटी 9 लाख 54 हजार 500 रुपयांची मालमत्ता आहे. तर रक्षा यांच्या नावावर 3 कार, 1 ट्रॅक्टर आणि 1 दुचाकी आहे. रक्षा खडसे यांच्या मुलांच्या नावे 77 लाख 36 हजार 381 रुपयांचे कर्ज ही आहे. खडसे यांचे वार्षिक उत्पन्न 89 लाख 53 हजार 390 रुपये आहे. शिवाय त्यांच्याकडे 210 ग्रॅम सोनेही आहे. 

जळगावचा श्रीमंत उमेदवार कोण? 

जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. करण पवार यांची एकूण संपत्ती 13 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यांच्याकडे स्थावर मालमत्ता ही 6 कोटी 20 लाख रुपयांची आहे. तर  पत्नी अंजली पवार यांच्याकडे 20 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर जंगम मालमत्ता 7 कोटी 39 लाख 20 हजार 277 रुपये इतकी आहे. पत्नी अंजली पवार यांच्याकडे 59 लाख 56 हजार 969 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे करण यांच्याकडे एकही वाहन नाही. करण यांच्याकडे 3 लाख रुपये किंमतीचे 60 ग्रॅम सोने, तर पत्नीकडे 50 ग्रॅम सोने आहे. करण यांच्यावर भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेचे 10 कोटीकर्जासह एकून 17 कोटीचे कर्ज आहे. 

स्मिता वाघ यांची संपत्ती किती? 

करण पवारां विरोधात जळगावमध्ये स्मिती वाघ निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे 3 कोटी 52 लाख 77 हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर स्मिता वाघ यांच्या मुलीच्या नावावर 21 लाख 4 हजारांची मालमत्ता आहे. जंगम मालमत्तेचा विचार करता वाघ यांच्याकडे 2 कोटी 56 लाख 97 हजार 898 रुपये इतकी आहे. मुलगी ईशानीच्या नावावर 48 लाख 51 हजार 526 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. शिवाय स्मिता वाघ यांच्या नावावर 1 कार व 1 दुचाकी आहे. 350 ग्रॅम सोने व 2 किलो चांदीचाही त्यात समावेश आहे. मुलीकडे 100 ग्रॅमचे दागिने आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com