'मी जे बोलतोय ते कोणी स्वत:हून आपल्या डोक्यावर घेऊ नये. आमच्याकडे म्हणतात की काही अतृप्त आत्मा असतात. ज्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही, ज्यांची स्वप्ने अपूर्ण राहतात त्यांचे आत्मे फिरत राहतात. स्वत:चं काम नाही झालं तर त्यांना इतरांचे काम बिघडवण्यात त्यांना आनंद मिळतो. महाराष्ट्रही अशा अतृप्त आत्म्यांचा शिकार झाला आहे.'
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुण्यातील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचं नाव न घेता टीका केली होती. या टिकेचे निवडणूक प्रचारात जोरदार पडसाद उमटले होते. त्यामुळे साहजिकच मंगळवारी (12 नोव्हेंबर) रोजी झालेल्या भाषणात पंतप्रधान पवारांवर काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण, मोदींनी निराशा केली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यातील भाषेत महायुती सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचला, पुणेकरांसाठी असलेलं व्हिजन मांडलं, मराठीला अभिजात भाषा देणे, कलम 370, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा केलेला अपमान हे सर्व मुद्दे मांडले. मोदींनी पुण्यातील भाषणात काँग्रेसवर सर्वाधिक टीका केली. उद्धव ठाकरे सरकारला स्थगिती सरकार म्हणून टोला लगावला. राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरेंची प्रशंंसा करायला लावा, असं उद्धव यांना आव्हान दिलं. पण, शरद पवारांबद्दल एकही शब्द उच्चारला नाही.
काय असेल कारण?
लोकसभा निवडणुकीत मोदींनी 'अतृप्त आत्मा' ही टीका केल्यानंतर शरद पवारांनी तो मुद्दा मोठा केला. 'हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही' असा इशारा पवारांनी दिला होता. त्यानंतरच्या प्रचारसभेत पवारांनी सातत्यानं हा टीकेचा मुद्दा मांडत लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला.
या निवडणुकीत शरद पवारांना कोणताही भावनिक मुद्दा द्यायचा नाही, असं मोदींनी ठरवलं असावं. त्यामुळेच त्यांनी आत्तापर्यंत पवारांवर टीका करणे टाळलं असावं.
( नक्की वाचा : जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास )
अजित पवार फॅक्टर
अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमधील महत्त्वाचा पक्ष आहे. अजित पवारांच्या पक्षाशी अनेक मतदारसंघात थेट शरद पवारांच्या पक्षाशी लढत आहे. अगदी बारामती मतदारसंघातही अजित पवारांसमोर त्यांच्या काकांनी तगडं आव्हान उभं केलं आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांचे मतदार समान आहेत. शरद पवारांच्या व्होटबँकेला तडा देण्यासाठीच भाजपानं अजित पवारांना सोबत घेतलं असं मानलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारंपारिक मतदारांच्या मनात शरद पवारांबद्दल आदर आहे. मोदींनी थेट शरद पवारांवर टीका केली तर ते मतदार दुखावले जाऊ शकतात. दुखावलेल्या या मतदारांनी तुतारीसमोरचं बटण दाबू नये. तसंच जिथं अजित पवारांचा उमेदवार नसेल तिथं महायुतीच्याच उमेदवाराला मतदान करावं हा देखील मोदींचा उद्देश असू शकतो. त्यामुळेच पंतप्रधान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवारांवर टीका करणे टाळत आहेत, असं मानलं जातंय.