महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा ( Maharashtra Assembly Election) प्रचार रंगात आला असून सर्व पक्षीय दिग्गज नेते आपापल्या पक्षाच्या, आघाड्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जाहीर सभा घेतल्या. शनिवारी झालेल्या जाहीर सभांमध्ये त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत म्हटले की, “बाळासाहेब ठाकरेंचं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अतुलनीय योगदान आहे. पण काँग्रेस नेत्यांच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंच्या कौतुकाचा एकही शब्द बाहेर येत नाही.”
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली होती. तेव्हापासून महाविकास आघाडी तयार झाली आहे. तेव्हापासून भाजपने शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. हाच धागा पकडत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस आणि शिवसेना(उबाठा) या दोघांनाही सवाल करत टीका केली. कडवट हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा अंगीकार करत राजकारण करणाऱ्या बाळासाहेबांची विचारधारा काँग्रेस मान्य करणार आहे का ? काँग्रेस बाळासाहेबांचे कौतुक करणार का ? असा सवाल पंतप्रधानांनी काँग्रेसला केला आहे. त्यांनी म्हटले की “काँग्रेसला मी आव्हान देतो… काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं कौतुक करावं आणि त्यांच्या विचारधारेला मान्यता द्यावी,” महाविकास आघाडी जन्माला आली तेव्हा परस्परविरोधी विचारधारेचे पक्ष एकत्र आल्याने अनेकांनी आश्चर्य वाटले होते. पंतप्रधानांनी हीच बाब ओळखत काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत काँग्रेससची कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकोला येथील भाषण UNCUT
राज ठाकरेंकडून शिवसेना (उबाठा) पक्षाची कोंडी एकीकडे पंतप्रधान मोदी हे काँग्रेसवर टीका करत असताना दुसरीकडे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेससोबत युती केल्यानंतर बाळासाहेबांच्या नावापुढे लावले जाणारे 'हिंदूहृदयसम्राट' हे बिरूद हटविण्यात आले असा आरोप राज ठाकरे यांनी केला. काही फलकांवर बाळासाहेबांच्या नावापुढे 'जनाब' लिहिण्यात आल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला. भांडूप इथे झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी म्हटले होते की "बाळासाहेब ठाकरेंची एक मुलाखत आहे. त्यात बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर शिवसेना नावाचं दुकान बंद करुन टाकेन. त्याच बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आणि आमचे बंधू हाताच्या पंजाचा प्रचार करत आहेत. काय दुर्दैव बघा! बाळासाहेब ठाकरेंना काय वाटत असेल!! मी काय करुन ठेवलं आणि आज काय झालं आहे त्याचं. "