ठाणे शिवसेनेचे खणखणीत नाणे! ठाणेकरांचा कौल कोणत्या शिवसेनेला?

शिवसेना आहे पण एका शिवसेनेचे दोन तुकडे झालेत. त्यामुळे कोणत्या शिवसेनेला साथ द्यायची अशा स्थितीत ठाणेकर होते. पण आता त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

Advertisement
Read Time: 4 mins
ठाणे:

ठाणे आणि शिवसेने हे एक वेगळेच नाते आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाण्याने शिवसेनेलाच साथ दिली आहे. मात्र आता स्थिती थोडी बदलली आहे. शिवसेना आहे पण एका शिवसेनेचे दोन तुकडे झालेत. त्यामुळे कोणत्या शिवसेनेला साथ द्यायची अशा स्थितीत ठाणेकर होते. पण आता त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे.  त्यामुळे त्यांनी कोणत्या शिवसेनेला साथ दिली आहे हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे. विजय हा शिवसेनेचाच होणार आहे. पण प्रश्न इतकाच आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचा की शिंदेंच्या शिवसेनेचा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

मतदान वाढले पण... 

ठाणे लोकसभा मतदार गेल्या वेळी 50 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावेळी हा मतांचा टक्का दोन टक्क्यांनी वाढला आहे. यावेळी ठाणे लोकसभा मतदार संघात 52.09 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ठाण्यातील सहा विधानसभा मतदारां पैकी ठाणे विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 59.52 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी मतदान हे ऐरोली विधानसभा मतदार संघात 48.47 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. काही मतदार संघात पन्नास टक्के मतदान झाले आहे. ठाणे शहरातील तीनही मतदार संघात चांगले मतदान झाले आहे. पण नवी मुंबईतील दोन आणि मिरा भाईंदर विधानसभेत कमी मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या कमी झालेल्या मतदानाचा कोणाला फटका बसणार आणि ठाण्यात वाढलेल्या मतदानाचा कोणाला फायदा होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. 

Advertisement

प्रचारातले महत्वाचे मुद्दे कोणते? 

ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरे आणि अनंत दिघे यांना मानणारे हो दोघेही शिवसैनिक. शिवसेनेत फुट पडली आणि विचारेंनी उद्धव ठाकरेंना साथ दिली तर नरेश म्हस्के यांनी शिंदें बरोबर राहाणे पसंत केले. त्यामुळे या निवडणुकीला खरी शिवसेना कोणाची आणि खोटी शिवसेना कोणाची असाच रंग प्रचारात होता. उद्धव ठाकरें यांनी प्रचारात आपल्या पाठीत खंजिक खुपसल्याचा आरोप केला. अशा लोकांना सरळ करण्यासाठी ठाण्यात आलो आहे. त्यामुळे गद्दारांना धडा शिकवा. दिघेंनीही गद्दारांना कधी माफ केले नव्हते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला विजयी करा असे भावनिक आवाहन ठाकरे यांनी केले होते. शिवाय तर खरी शिवसेना आपलीच आहे. बाळासाहेब आणि अनंत दिघेंच्या विचारावर चालणारी आहे. असा प्रचार शिंदे गटाकडून केला गेला. मतदार संघातल्या प्रश्नां पेक्षा भावनिक प्रश्नांनाच प्रचारा दरम्यान अधिक महत्व दिले गेले. 

Advertisement

मतदार संघात कोणाची किती ताकद? 

ठाणे लोकसभा मतदार संघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ येतात. त्यापैकी ठाण्यातील तिनही मतदार संघावर महायुतीचा कब्जा आहे. त्यात दोन जागा या शिंदे गटाच्या आहेत. तर एक जागाही भाजपची आहे. नवी मुंबईतल्या दोनही जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर मिरा भाईंदरची एक जागा अपक्ष असलेल्या गिता जैन यांच्याकडे आहे. त्यामुळे पक्षीय बलाबल पाहाता कागदावर तरी म्हस्के यांची बाजू वरचढ दिसते. मात्र पक्ष फुटीनंतरही पहिलीच निवडणूक होत आहे. त्यामुळे फुटी नंतर शिवसैनिक कोणाच्या बाजूने आहेत हे निश्चित सांगता येत नाही. त्यामुळेच ही लढत चुरशीची ठरताना दिसत आहे. सहा पैकी पाच जागांवर महायुतीच्या आमदारांचा कब्जा आहे. ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पारडे ठाणे लोकसभेत रिकामेच आहे. मात्र महायुतीतील नाराजी ही राजन विचारेंच्या पथ्यावर पडणारी आहे. हा मतदार संघ भाजपला मिळावा यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र तो शिंदे गटाला गेल्याने भाजपचा एक मोठा गट नाराज झाला होता. गणेश नाईक यांना आपली नाराजी लपवता आली नाही. त्यामुळे ही बाब शिंदे आणि म्हस्के यांच्यासाठी टेन्शन वाढवणारी आहे. शिवाय ठाण्याची जागा ही मुख्यमंत्री शिंदेंसाठी प्रतिष्ठेची आहे. 

Advertisement

ठाणे लोकसभेचा इतिहास काय? 

ठाणे लोकसभा मतदार संघावर तसा भाजपचा वरचष्मा होता. रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांनी या मतदार संघातून प्रतिनिधित्व केले. 1991 पर्यंत हा भाजपच्या ताब्यात होता. पण नंतर अनंद दिघेंनीहा आग्रहाने हा मतदार संघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला. त्यानंतर शिवसेना आणि ठाणे असे एक समिकरणचं बनले. 1996 साली पासून सलग चार वेळा प्रकाश परांजपे यांनी लोकसभेत शिवसेनेचा भगवा फडकवला. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र आनंद परांजपेही लोकसभेवर निवडून गेले. मात्र 2009 च्या लोकसभा निवडणुकीत संजीव नाईक यांनी शिवसेनेच्या याबालेकिल्ल्याला सुरूंग लावत मोठा विजय मिळवला. मात्र 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदार संघ पुन्हा आपल्याकडे खुचून आणला. राजन विचारे यांनी सलग दोन वेळा विजयाची नोंद केली. 

ठाकरे शिंदेंची प्रतिष्ठा पणाला 

ठाणे म्हणजे शिवसेनेचा गड समजला जातो. यागडावर आधी अनंत दिघे आणि नंतर एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व होते. शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर ठाण्यातील अनेक नगरसेवक, आमदार हे शिंदे बरोबर गेलेत. तर शिवसैनिक आपल्या बरोबरच असल्याचा दावा ठाकरेंचा आहे. अशात ही लढत होत आहे. शिंदेंना काही करून ही जागा जिंकावी लागेल. तसे न झाल्यास त्यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. शिवाय ही जागा भाजपला मिळाली म्हणून भाजपही आग्रही होती. त्याकडे शिंदेंना कानाडोळा करता येणार नाही. ठाकरेंनीही संपुर्ण ताकद इथे पणाला लावली आहे. जर शिंदेंना त्यांच्याच घरात शह दिला तर त्यांच्या अडचणी वाढतील हे ठाकरेंना ठावूक आहे. त्यादृष्टीनेच रणनिती आखली गेली आहे.