विधानसभा निवडणुकासाठी मतदान पुर्ण झाले आहे. आता प्रत्येकाला प्रतिक्षा आहे ती निकालाची. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार की महायुतीचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. की सरकारची चावी इतर कोणाच्या हाती असणार याचीही चर्चा आता होवू लागले आहे. निवडणूक मतदानानंतर जे एक्झिट पोल समोर येत आहेत त्यानुसार काही जण महाविकास आघाडीचे सरकार येणार असं सांगत आहेत तर काही ठिकाणी महायुतीला कौल मिळताना दिसत आहे. अशा वेळी राज ठाकरेंच्या मनसेला किती जागा मिळणार याचेही आकडे एका एक्झिट पोलमधून समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जवळपास सर्वच एक्झिट पोलनी महाविकास आघाडी आणि महायुतीला किती जागा याचे आकडे दिले आहे. त्यात काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना ठाकरे गट यांना किती जागा मिळतील याचे विश्लेषण केले आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जागांचाही उल्लेख केला आहे. मात्र इतर आणि छोट्या पक्षांचा उल्लेख केला नाही. त्यात खास करून मनसे आणि वंचितच्या जागांचा उल्लेख दिसत नाही.
पण एका एक्झिट पोलमध्ये मुख्य पक्षां बरोबरच मनसे आणि वंचितला किती जागा मिळणार हे सांगितले आहे. हा एक्झिट पोल दैनिक भास्करने केला आहे. या पोलमध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला दोन ते तीन जागांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे यावेळची मनसेची स्थिती थोडी सुधारलेली दिसेल. पण या जागांवर सत्ता स्थापनेत मनसेची भूमीका महत्वाची असेल का? याचे उत्तरही या पोलमधून देण्यात आले आहे. भास्करच्या एक्झिट पोल नुसार महाविकास आघाडीला 135-150 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. तर महायुतीला 125-140 जागा दाखवल्या आहेत. त्यामुळे जरी सत्ता स्थापनेची संधी मविआला असली तरी महायुतीही सत्तेच्या जवळपास असेल. अशा वेळी राज ठाकरे यांची भूमीका महत्वाची ठरू शकते.
या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात काँटे की टक्कर असल्याचे दिसत आहे. यात मनसे प्रमाणे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला 2-3 जागा मिळणार असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे छोट्या पक्षांना महत्व प्राप्त होणार आहे. जर त्रिशंकू विधानसभा येणार असेल तर अशा वेळी छोटे पक्ष आणि अपक्षांचे भाव वधारणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेने नेमका काय कौल दिला आहे हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.