Baba Siddique Passes Away: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार गट) बाबा सिद्दिकी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेरच गोळीबाराची घटना घडली. यानंतर तातडीने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दिकी हे शानदार इफ्तार पार्टींसाठी देखील ओळखले जात होते. शाहरुख खान आणि सलमान खानसह बॉलिवूडमधील कित्येक दिग्गज कलाकार त्यांच्या पार्टीमध्ये सहभागी होत असत.
#UPDATE | Senior NCP leader Baba Siddique passes away: Lilavati Hospital https://t.co/P0VWePWldd
— ANI (@ANI) October 12, 2024
सलमान आणि शाहरुखमधील मिटवला होता वाद
सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील वाद मिटवून त्यांना पुन्हा एकत्र आणणारे बाबा सिद्दिकीच होते. अभिनेत्री कतरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान या दोघांमध्ये वाद झाला होता. वादामुळे या दोघांमध्ये कित्येक वर्षे अबोला निर्माण झाला होता. बॉलिवूडच्या करण-अर्जुनमधील भांडण मिटवण्याची जबाबदारी अखेर बाबा सिद्दिकी यांनी घेतली आणि ती पार देखील पार पाडली. बाबा सिद्दिकी यांनी आपल्या इफ्तार पार्टीमध्ये दोन खानमधील वाद संपुष्टात आणला होता.
(नक्की वाचा: Big Breaking News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या, SRA च्या वादातून गोळीबार?)
NCP अजित पवार गटामध्ये नुकतेच झाले होते सहभागी
जियाउद्दीन सिद्दिकी असे बाबा सिद्दिकी यांचे पूर्ण नाव आहे. मुंबईतील एमएमके कॉलेजमध्ये त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि विद्यार्थी असतानाच त्यांनी काँग्रेस पक्षाचा मार्ग स्वीकारला होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला होता.
(नक्की वाचा: बाबा सिद्दिकींवर गोळीबार करणारे 2 आरोपी अटकेत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती)
बाबा सिद्दिकी यांचे सामाजिक कार्य
सलमान खानला त्याच्या अडचणीच्या काळात बाबा सिद्दिकी यांनी कायम मदत केली. जेव्हा जेव्हा सलमान खानला कोर्टासमोर हजर राहावे लागले, तेव्हा बहुतांश वेळेस बाबा सिद्दिकी त्याच्यासोबत असत. बाबा सिद्दिकी यांनी मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य देखील केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात सलमान खानसोबत मिळून त्यांनी अनेकांची मदत केली आहे.
आरोपींनी तीन गोळ्या झाडल्या
वांद्रे येथील खेरवाडी सिग्नल परिसरात बाबा सिद्दिकी यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांचे कार्यालय आहे. या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दिकी यांच्यावर आरोपींनी तीन गोळ्या झाडल्या. गोळ्या पोटाच्या भागावर झाडण्यात आल्याचे म्हटले जात आहे. घटनेनंतर त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बाबा सिद्दिकी यांना Y श्रेणीतील सुरक्षा प्रदान करण्यात आलेली असताना ही घटना घडल्याने गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world