
Coolie Box office collection: सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांच्या 'कुली' (Coolie) चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने जगभरातून ₹151 कोटींपेक्षा जास्त कमाई करून तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कोणत्याही तमिळ चित्रपटासाठी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कमाई मानली जात आहे. या शानदार यशामुळे रजनीकांतचे चाहते आणि चित्रपटसृष्टी खूप उत्साहित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले असून, 'कुली' हा रजनीकांतसोबतचा त्यांचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात रजनीकांत यांनी एका कुलीची भूमिका साकारली आहे. जो भ्रष्ट लोकांच्या विरोधात धाडसी लढा देतो. त्यांची भूमिका दमदार आणि भावनिक असल्यामुळे ती प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे.
या चित्रपटात रजनीकांत यांच्या व्यतिरिक्त सौबिन शाहिर, उपेंद्र, श्रुती हासन, सत्यराज आणि नागार्जुन यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. त्याचबरोबर, बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आमिर खान यांनीही या चित्रपटात विशेष भूमिका केली आहे. ज्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणि बॉक्स ऑफिसवरील कमाई वाढली आहे. आमिर खानच्या उपस्थितीमुळे या चित्रपटाची देशभरात जास्त चर्चा झाली आहे. 'कुली' चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्सच्या बॅनरखाली झाली असून, त्याचे वितरण पेन स्टुडिओज करत आहे.
हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी भारत आणि जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी प्रचंड कमाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. निर्मात्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले. रजनीकांत यांचे या अभूतपूर्व यशाबद्दल अभिनंदन केले. 'कुली' हा रजनीकांत यांचा 171 वा चित्रपट असून, आजही भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांचे स्थान किती खास आहे हे यातून दिसून येते. या शानदार सुरुवातीवरून हे स्पष्ट होते की, 'कुली' केवळ तमिळ चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मोठा हिट चित्रपट ठरेल.
चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. येणाऱ्या काळात हा चित्रपट आणखी मोठा व्यवसाय करेल. एकंदरीत, 'कुली' ही रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील आणखी एक अविस्मरणीय उपलब्धी ठरली आहे. त्याच वेळी, याच दिवशी प्रदर्शित झालेला हृतिक रोशनचा 'वॉर 2' कमाईच्या बाबतीत 'कुली'पेक्षा खूप मागे राहिला आहे. 'वॉर 2' ने भारतात पहिल्या दिवशी ₹52.50 कोटी कमावले आहेत. ज्यात हिंदी व्हर्जनमधून ₹29 कोटी, तेलुगू व्हर्जनमधून सुमारे ₹23.25 कोटी आणि तमिळ व्हर्जनमधून सुमारे ₹0.25 कोटींचा वाटा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world