Actor Dharmendra News: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर कुटुंबीयांसह चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळलाय. वयाच्या 89व्या वर्षी धर्मेंद्र यांचे राहत्या घरी निधन झालं. निधनानंतर त्यांच्या जीवनाशी संबंधित कित्येक जुने-नवे किस्से ऐकायला मिळत आहेत. यापैकीच धर्मेंद्र आणि हेमा मालिनींच्या प्रेमकथेशी संबंधित गोष्टीची सोशल मीडियावर खूप चर्चा होतेय. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये डिंपल कपाडिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावलीय. हेमा मालिनी त्यांच्या आत्मचरित्रातील माहितीनुसार, एक काळ असा होता जेव्हा डिंपल यांनी हेमा यांना स्पष्टपणे सांगितले होते की धर्मेंद्र कधीही तुझ्याशी लग्न करणार नाही.
डिंपल-हेमा यांची मैत्री आणि जीवनातील वेदनादायी टप्पा
राम कमल मुखर्जी यांनी लिहिलेल्या 'हेमा मालिनी- बियॉन्ड द ड्रीम गर्ल' या आत्मचरित्रातील माहितीनुसार, हेमा राजेश खन्ना यांच्यासोबत काम करत होत्या, त्यावेळेस हेमा आणि डिंपलची मैत्री फुलली. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लग्न करून डिंपल यांनी नव्या जीवनास शुभारंभ केला होता. दरम्यान हेमा त्यांच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी मोठ्या आहेत. या दोन्ही अभिनेत्रींमध्ये त्यांच्या वयामुळे नाही तर जीवनातील वेदना आणि एकटेपणामुळे मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. बहुतांश वेळेस डिंपल एकट्याच धुम्रपान आणि मद्यपान करत असे. राजेश खन्ना शुटिंगनंतर मित्रांसोबत वेळ घालवत आणि डिंपल तास-न्-तास एकटी राहत असे. हेमा यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर ती एक अशी लहान मुलगी होती, जिला परिस्थितीने अचानक प्रौढ होण्यास भाग पाडलं.
(नक्की वाचा: Dharmendra: राहिल्या फक्त आठवणी...धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, शेअर केले अतिशय खास फोटो)
डिंपल यांची तिखट प्रतिक्रिया
तो काळ खुद्द हेमा यांच्यासाठी अतिशय कठीण होता, त्यांचे धर्मेंद्र यांच्यावर प्रेम होतं. पण ते विवाहित आणि चार मुलांचे वडीलही होते. डिंपल कपाडिया त्यांच्या नात्यातील संघर्षांमुळे आधीच कोलमडल्या होत्या. अशा परिस्थितीत हेमा यांच्यावर त्यांचा अनेकदा राग निघत असे. आत्मचरित्रानुसार आपण खूप रागीट असल्याचं स्वतः डिंपल यांनी कबुल केलं होतं आणि त्यांना हेमा यांची काळजीही वाटायची. म्हणून एके दिवशी डिंपल यांनी हेमांना थेट म्हटलं की, "हा माणूस कधीही तुझ्याशी लग्न करणार नाही. तू स्वतःचं नुकसान करून घेत आहेस."
(नक्की वाचा: Hema Malini Networth: धर्मेंद्र की हेमा मालिनी, सर्वाधिक श्रीमंत कोण? किती आहे ड्रीम गर्लचं एकूण नेटवर्थ)
पण धर्मेंद्र यांनी डिंपल कपाडिया यांचे हे शब्द चुकीचे ठरवले आणि 1980 साली धर्मेंद्र-हेमा यांनी लग्न केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

