- धुरंधरने कराचीमधील ल्यारी परिसर आणि पोलीस अधिकारी चौधरी असलम यांची स्टोरी दाखवली आहे.
- पाकिस्तान सरकारने धुरंधर चित्रपटावर तीव्र आक्षेप घेत घेतला आहे.
- सिंध प्रांताचे मंत्री शरजील इनाम मेमन यांनी ल्यारी परिसराचे नकारात्मक चित्रण असल्याचे सांगितले.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' (Dhurandhar) या बॉलिवूड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आणि सोशल मीडियावर मोठा प्रभाव पाडला आहे. एका बाजूला प्रेक्षकांची प्रशंसा मिळत असताना, दुसरीकडे या चित्रपटाने पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ माजवली आहे. विशेषतः, चित्रपटात कराचीमधील ल्यारी (Lyari) परिसर आणि पोलीस अधिकारी चौधरी असलम यांची नकारात्मक प्रतिमा ज्या पद्धतीने दर्शविण्यात आली आहे, त्यावर पाकिस्तानने तीव्र आक्षेप घेतला आहे. या चित्रपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यावर पाकिस्तान सरकारने यावर टीका केली आहे.
याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने पुढील महिन्यात 'मेरा ल्यारी' (Mera Lyari) नावाचा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. ल्यारी हे केवळ हिंसेचे केंद्र नसून तेथील संस्कृती, धैर्य आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे, असा संदेश या चित्रपटातून पाक सरकार देण्याचा प्रयत्न करणार आहे. सिंध प्रांताचे मंत्री शरजील इनाम मेमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर अधिकृत निवेदन जारी केले. 'धुरंधर' चित्रपटात ल्यारी परिसराचे जे नकारात्मक चित्रण केले आहे, ते पूर्णपणे असत्य आणि दिशाभूल करणारे आहे असं त्यांनी सांगितलं.
त्यांनी पुढे सांगितलं आहे की ल्यारीचा खरा चेहरा यापेक्षा खूप वेगळा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मेमन यांच्या मते, ल्यारीमध्ये केवळ गुन्हेगारी आणि हिंसा नाही, तर हे ठिकाण शांतता, प्रतिभा आणि अभिमानाचे उदाहरण आहे. भारतीय चित्रपटाने चुकीच्या पद्धतीने सादर केलेली ल्यारीची कथा 'मेरा ल्यारी' या पाकिस्तानी चित्रपटातून जगासमोर आणली जाईल असं ही त्यांनी सांगितलं. पाक मंत्र्यांचे हे वक्तव्य पाकिस्तानला त्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेबद्दल वाटणारी तीव्र चिंता दर्शवते. 'धुरंधर'मध्ये दर्शवलेली ल्यारी परिसरातील टोळीयुद्धे (Gangwar), पोलीस कारवाई आणि गुन्हेगारीची गडद बाजू यामुळे पाकिस्तान सरकार पूर्णपणे अस्वस्थ झाले आहे.
'धुरंधर'ने निर्माण केलेल्या नकारात्मक चित्रणाला 'कव्हर' करण्यासाठीच 'मेरा ल्यारी' हा चित्रपट तातडीने तयार करण्यात आला आहे, हे या सरकारी भूमिकेवरून स्पष्ट होते. 'मेरा ल्यारी' हा पाकिस्तानकडून केलेला एक प्रकारचा विरोध आणि आत्म-समर्थन (self-justification) आहे. कराचीतील ल्यारी परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या गुन्हेगारीसाठी ओळखला जातो. 'ल्यारी' हे नाव 'ल्यार' (कब्रिस्तानात उगवणारे झाड) या शब्दातून आले आहे. 2000 च्या दशकात झालेल्या टोळीयुद्धांमुळे येथे अनेक थडगी खोदली गेली. याच शहराने रहमान डकैतचा उदय आणि अंत पाहिला. 1990 च्या दशकात रहमानने शस्त्रे, अंमली पदार्थांची तस्करी आणि खंडणीच्या जोरावर आपले साम्राज्य उभे केले होते. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत त्याने ल्यारीमध्ये आपला संपूर्ण अंमल प्रस्थापित केला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world