Entertainment News: 1650 कोटींची संपत्ती आणि सलग 14 हिट सिनेमे, या सुपरस्टारने बिग बींनाही फोडला होता घाम

Entertainment News: दक्षिणेकडील या सुपरस्टारने 45 वर्ष आपल्या करिअरमध्ये 156 सिनेमांमध्ये काम केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Entertainment News: अमिताभ बच्चन यांच्या स्टारडमला या सुपरस्टार दिला होता धक्का"

Entertainment News: एकेकाळी हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचं करिअर यशाच्या शिखरावर होतं. पण त्याच काळात दक्षिण भारतातून एक असा तारा उदयास आला, ज्याच्या लोकप्रियतेने आणि बॉक्स ऑफिसवरील यशाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. या अभिनेत्याने सलग 14 हिट सिनेमे देऊन चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली होती. आज हा सुपरस्टार सुमारे 1650 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह भारतीय चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. जर तुम्ही अजूनही ओळखले नसेल, तर आम्ही दाक्षिणात्य मेगास्टार चिरंजीवी यांच्याबबाबत बोलत आहोत.

चिरंजीवी यांचे खरे नाव काय? Chiranjeevi Real Name

मेगास्टार चिरंजीवी यांचे खरे नाव कोणिदेल शिव शंकर वर प्रसाद असे आहे. त्यांनी हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड सिनेमांतील आपल्या अभिनयाने आणि दमदार डान्सने लोकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. चिरंजीवी यांनी वर्ष 1978 मध्ये 'पुनाधिरल्लू' या सिनेमातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठे पुरस्कार पटकावले आहेत. चिरंजीवी यांना आंध्र प्रदेशचा सर्वोच्च चित्रपट सन्मान 'रघुपती व्यंकय्या पुरस्कार', तीन नंदी अवॉर्ड्स, नऊ फिल्मफेअर अवॉर्ड्स (साऊथ) आणि लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारने वर्ष 2006 मध्ये त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते.

गिनीज् वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चिरंजीवींच्या नावाची नोंद

चिरंजीवी यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की, त्यांचा 'कोडामा सिम्हम' (1990) हा इंग्रजीमध्ये डब झालेला पहिला दाक्षिणात्य चित्रपट होता. 45 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 156 सिनेमांमध्ये काम केले आहे. या सिनेमांमध्ये त्यांनी 537 गाण्यांवर नृत्य केले असून 24,000पेक्षा जास्त डान्स स्टेप्स केल्या आहेत, ज्यासाठी त्यांना 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स'तर्फे सन्मानित करण्यात आले आहे.

(नक्की वाचा: Vishakha Subhedar Son Video: कुवेत ते मुंबई...700 किमीचा प्रवास आणि युद्धाची भीती; विशाखा सुभेदारचा मुलगा सुखरुप मायदेशी परतला)

Advertisement

राजकारणातही नशीब आजमावले | Chiranjeevi Political Career

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलथूर येथे 22 ऑगस्ट 1955 रोजी जन्मलेल्या चिरंजीवी यांनी सिनेसृष्टीत मोठे यश संपादन केल्यानंतर राजकारणातही पाऊल ठेवले. त्यांनी 'प्रजा राज्यम पार्टी'ची (PRP) स्थापना केली. पण राजकारणात त्यांना सिनेमासारखे यश मिळू शकले नाही. त्यानंतर 2011 मध्ये त्यांनी आपल्या पक्षाचे विलीनीकरण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये केले. यानंतर त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाली आणि 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ही जबाबदारी मिळाली. त्यांचा राजकीय प्रवास छोटा असला तरी सिनेसृष्टीत चिरंजीवी यांची जादू आजही कायम आहे. सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा राम चरण देखील साऊथचा सुपरस्टार असून, त्याच्या 'RRR' या सिनेमाने ऑस्करवर नाव कोरले आहे.

Photo Credit: NDTV Marathi

Topics mentioned in this article