
Gulkand Marathi Movie Teaser: ‘गुलकंद' हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी सिनेमा 1 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. आता व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने ‘गुलकंद' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘गुलकंद'च्या निमित्ताने सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही भन्नाट जोडी पहिल्यांदाच कपल म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तर प्रसाद ओक - ईशा डे यांचीही अफलातून जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
टीझरमध्ये ढवळे आणि माने जोडप्यांच्या नात्याचा प्रवास पाहायला मिळतोय. व्हिडीओमध्ये सई - समीरमधील गोड संवाद आणि प्रेमळ नाते दिसत आहे तर दुसरीकडे प्रसाद - ईशा यांच्यातील गंमतीशीर नोकझोक दिसत आहे. हलक्याफुलक्या, गंमतीशीर प्रसंगांसोबतच प्रेमाची झलकही पाहायला मिळतेय. फ्रेश जोड्यांची अफलातून केमिस्ट्री पाहून सिनेरसिकांच्या मनात या फॅमकॉम चित्रपटाबाबत उत्सुकता प्रचंड वाढलीय. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक आणि सई ताम्हणकर यांच्या नजरेने मात्र प्रेक्षकांच्या मनात प्रश्नही निर्माण केला आहे. त्यामुळे आता हा 'गुलकंद' किती मुरलेला आहे, हे 1 मे रोजी प्रेक्षकांना थिएटरमध्ये पाहायला मिळेल.
(नक्की वाचा : Rinku Rajguru: 'रिंकू आणि मी ठरवूनच...','त्या' फोटोवरुन कृष्णराज महाडिक पहिल्यांदाच थेट बोलले)
सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणाले आहेत की, " गुलकंद हा चित्रपट म्हणजे प्रेम आणि नातेसंबंधातील गोडव्याचा एक अनोखा मनोरंजक प्रवास आहे. तुमच्या आमच्या घरातील ही गोष्ट असून यात दिसणारे हटके कपल्स आपल्याला अनेकदा आपल्या आजूबाजूला दिसतात आणि म्हणूनच ‘गुलकंद'शी प्रेक्षक सहज समरस होतील. बऱ्याच वर्षांनंतर मराठी चित्रपटसृष्टीत असा एक फॅमकॉम चित्रपट येत आहे.
प्रेक्षकांनी अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारताना समीर चौघुलेला पाहिले आहे. मात्र पहिल्यांदाच ‘गुलकंद' मध्ये समीर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. या टीझरमध्ये दाखवलेली ढवळे आणि माने कुटुंबातील जिव्हाळा रसिकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, याचा विश्वास आहे. हा चित्रपट प्रत्येकाला हसवतानाच त्यांच्या आयुष्यातील प्रेमाची गोड आठवण करून देईल."
(नक्की वाचा: 'पुन्हा मुलगी होईल याची भीती, राम चरणला यावेळेस मुलगा व्हावा...' चिरंजीवींचे वादग्रस्त विधान)
सिनेमाबाबत निर्माते संजय छाब्रिया म्हणाले की, "आम्ही नेहमीच वेगळ्या संकल्पनांवर आधारित चित्रपट निर्मितीवर भर दिला आहे. गुलकंदचे किमान 10 आरोग्यदायी फायदे असतात, पण हा चित्रपट 11व्या आणि सर्वात महत्त्वाच्या फायद्याबद्दल आहे तो म्हणजे आनंद! गुलकंदाप्रमाणेच गोड, सुगंधित आणि आरोग्यदायी असलेला हा चित्रपट प्रेम, नातेसंबंध आणि कौटुंबिक भावनेचा गोडवा मांडतो. हा चित्रपट जितका गोड आणि भावनिक आहे तितकाच प्रेक्षकांना खळखळून हसवणारा देखील आहे. सर्व तगड्या कलाकारांनी या चित्रपटाला एक वेगळीच उंची दिली आहे. टीझरमध्ये दाखवलेल्या दोन कपल्सच्या वेगळ्या नात्यांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावेल. काही खट्याळ प्रसंगासोबतच प्रेमाची नाजूक झलकही प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. विनोदाने भरलेला हा कौटुंबिक मनोरंजनाचा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने नक्कीच एकत्रित पाहावा."
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world