
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाषेवरून वाद सुरू आहे. ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर आल्यानंतर हा वाद हिंदी विरुद्ध मराठी असा झाला आहे. याचा परिणाम बॉलिवूडवर होईल का, या प्रश्नाचे उत्तर सध्या तरी कोणी देऊ शकत नाही. मात्र, भाषांमध्ये सामंजस्य कसे साधायचे, या प्रश्नाचे उत्तर अभिनेते आशुतोष राणा यांनी अतिशय सुंदरपणे दिले आहे. 'हीर एक्सप्रेस' या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी त्यांना मराठी आणि हिंदी भाषेबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी दिलेली प्रतिक्रियेची चर्चा होत आहे.
नक्की वाचा - मुस्लीम देश, मुस्लिम शहर, मुस्लिम जनता अन् रामायणाचा प्रयोग, देशाचं नाव ऐकून बसेल धक्का
'हीर एक्सप्रेस' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी आशुतोष राणा यांना मराठी भाषेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी मराठीतच उत्तर दिले. ते म्हणाले, "माझी बायको मराठी आहे." त्यानंतर त्यांना विचारण्यात आले की, बाहेर भाषेवरून इतका वाद सुरू आहे, तुम्ही घरी काय करता? या प्रश्नावर आशुतोष राणा म्हणाले की, "भाषा संवादाचा विषय आहे. भाषा कधीही वादाचा विषय नसते." ते पुढे म्हटले की, "भारत एक अद्भुत आणि परिपक्व देश आहे. जिथे सर्व गोष्टींचा स्वीकार केला आहे." ते असं ही म्हणाले की "भारत देश संवादावर विश्वास ठेवतो, भारत देश कधीही वादावर विश्वास ठेवत नाही." त्यांच्या या उत्तराला खूप टाळ्या मिळाल्या.
'हीर एक्सप्रेस' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान आशुतोष राणा यांना हे प्रश्न विचारण्यात आले. यावेळी मंचावर संजय मिश्रा आणि गुलशन ग्रोवर हे कलाकारही उपस्थित होते. तसेच, या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री दिविता जुनेजा देखील या दिग्गज कलाकारांसोबत मंचावर दिसली. 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट एक कौटुंबिक ड्रामा असून, तो मनोरंजन आणि कॉमेडीने परिपूर्ण असेल. या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण लंडनमध्ये झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world